एअर इंडिया पाठोपाठ किंगफिशरचे वैमानिक संपावर

मुंबई, दि. १० – एअर इंडिया पाठोपाठ आता किंगफिशरच्या दिल्लीतील वैमानिकांनीही गुरूवारी आजारपणाचे कारण पुढे करून कामाला दांडी मारली आहे. त्यामुळे किंगफिशरची १५ उड्डाणे रद्द करण्यात आली. तर आधीच एअर इंडियाच्या वैमानिकांनी पुकारलेल्या संपामुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांचा आणखी खोळंबा झाला आहे.
    किंगफिशरच्या मुंबईतील वैमानिकांनीही गुरूवार रात्रीपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे डबघाईला आलेली विजय मल्ल्या यांची किंगफिशर विमानसेवा आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. किंगफिशर वैमानिकांचे जानेवारीतील वेतन ९ मे पासून देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. परंतु, अद्याप वेतन दिले गेले नसल्याने व्यवस्थापन दिलेला शब्द पाळत नसल्याचे सांगून वैमानिकांनी अचानक कामाला अनुपस्थिती लावली.
    सीमला, डेहराडून, धर्मशाळा आणि जयपूर ही उड्डाणे गुरूवारी दिल्लीहून रद्द करण्यात आली. ५ मे रोजी कर्मचार्‍यांशी झालेल्या चर्चेत किंगफिशर विमानसेवेचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी जानेवारीतील वेतन ९ मे नंतर देण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. कर्मचार्‍यांचे डिसेंबरमधील वेतन ४ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान टप्प्याटप्प्याने दिले जाईल, असे व्यवस्थापनाने गेल्या महिन्यात सांगितले होते. परंतु, काही कर्मचार्‍यांना २४ एप्रिलपर्यंत वेतन देण्यात आले.
    या प्रकरणाचा तात्काळ निपटारा करण्यासाठी किंगफिशरच्या वैमानिक आणि अभियंत्यांनी कामगार न्यायालयात जाणार असल्याचे गेल्या आठवड्यात सांगितले होते.
गेल्या वर्षभरापासून किंगफिशर विमानसेवा डबघाईला आली आहे. डिसेंबर तिमाहीत किंगफिशरला ४४४.२६ कोटी रूपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात किंगफिशरला १ हजार २७ कोटी रूपयांचा तोटा झाला तर ७,०५७.०८ कोटी रूपयांचे कर्ज किंगफिशरवर आहे.