विक्रमवीर सेहवाग

 आयपीएल स्पर्धेत वीरेंद्र सेहवागने आगळेवेगळे दोन विक्रम करून धडाकेबाज शैलीची चुणूक दाखवून दिली. त्याने आयपीएल स्पर्धेत सतत पाच अर्धशतके ठोकली आहेत. आत्तापर्यंत कसोटी अथवा एकदिवसीय सामन्यात अशा स्वरूपाचा विक्रम कोणीच केला नाही.कांही दिवसांपूर्वी सूर हरविल्याने सेहवागला उपकर्णधारपद गमावतानाच कांही काळ संघाबाहेर रहावे लागले होते. त्यामुळे चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळविण्याचे व टीकाकारांचे तोंड बंद करण्याचे आव्हान त्याचा समोर  होते. हे आव्हान त्याने लिलया पेलताना नावाला साजेशी कामगिरीही केली आहे.
  सेहवागने दिल्ली डेअरडेव्हील्सच्या माध्यमातून यावेळी चांगलाच जम बसविला आहे. त्याने आत्तापर्यंतच्या ११ सामन्यात ४६८ धावा केल्या आहेत.सध्या तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएल स्पर्धेतील ६१ सामन्यांतून १८५२ धावा केल्या आहेत. त्यासोबतच सेहवागने आणखी एक अनोखा विक्रम साधला आहे. त्याने २२२ चौकार व ७८ षटकार खेचत चौकार व षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले आहे. या स्पर्धेत त्याने १० पैकी ८ सामन्यात विजय मिळवित सध्या दिल्लीला अग्रस्थानी आणले आहे.
  आशिया कप स्पर्धेवेळी सेहवागकडून उपकर्णधारपद काढून घेतल्याने त्याला पुन्हा संघात स्थान मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. कर्णधार महेंद्रसिग धोनी सोबत थोडासा वाद झाल्याने त्याला संघातून वगळण्यात आल्याची चर्चा होती. प्रसारमाध्यमांकडूनही त्याच्या खेळीबाबत टीकेचा भडीमार झाला होता. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करीत पुन्हा संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. आगामी काळातील वीरूची खेळी यावेळी दिल्ली डेअर डेव्हिल्सला प्रथमच आयपीएल स्पर्धेत विजेतेपद पटकावून देता का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.