
यावेळेसच्या आयपीएल स्पर्धेत पुणे वॉरिअर्सची कामगिरी सुधारून संघ पहिल्या चार संघात स्थान पटकावेल असे वाटत होते. युवराज सिंगच्या गैरहजेरीत सौरभ गांगुलीची दादागिरी चालेल अशी आशा असतानाच पुणे संघाच्या बुडत्या नौकेला दादाची किमया आधार देऊ शकली नसल्याचे दिसून आले.
आयपीएलच्या पाचव्या स्पर्धेत सुरवातीच्या सामन्यात पुणे वॉरियर्सनी चांगली कामगिरी केल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने यावेळच्या स्पर्धेतून ‘ पॅकअप‘ करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. कांही हातातोंडाशी आलेल्या सामन्यात पुणे वॉरियर्सने पराभव विजयात बदलण्याची संधी हातची घालविल्याने ही नामुष्की ओढविली आहे. दोन महिन्यांपूर्वीच स्पर्धेत सहभागी होण्यावरून व्यवस्थापन व पुणे वॉरिअर्सचा मालक असलेल्या सहारा संघात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भारतीय संघाची स्पॉन्सरशीप मागे घेतली गेली होती. आयपीएल स्पर्धेतील सहभागाबद्दल अनिश्चितता होती. त्यानंतर मात्र दोघांत समेट झाल्याने पुणे संघानी सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
दादाच्या नेतृत्त्वाचा ‘सहारा‘ पुणे वॉरिअर्सला लाभल्याने संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे सुरवातीच्या कांही सामन्यात पुणे संघाने दादागिरी करत सामने जिकले. मात्र गेल्या आयपीएल स्पर्धेप्रमाणे विजयाची संख्या चारच्या पुढे जायला तयार नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क याच्या समावेशानंतर थोडेसे चित्र पालटेल अशी अपेक्षा होती मात्र तीही आशा फोल ठरली. यावेळेस कांही सामने पुण्यातील नव्या मैदानावर झाल्याने प्रेक्षकांचाही चांगला पाठिबा लाभला. मात्र पुणे संघाला फलंदाजी व गोलंदाजीत फारशी सुधारणा करता न आल्याने संघात रॉबीन उथप्पा,रायडर्स, स्मिथ सारखी दिग्गज मंडळी असतानाही यावेळेच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.
