
कोलकाता दि.७- अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी किलंटन यांनी त्यांना भारतातील रस्त्यावरून कोणत्याही सुरक्षेशिवाय मुक्तपणे भटकायला आवडेल असे सांगितले आहे. रविवारी भारतभेटीवर आल्यानंतर त्या प्रथम कोलकाता येथे गेल्या असून सोमवारी तेथील ला मार्टिनरी मुलींच्या शाळेत मुलींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
हिलरी म्हणाल्या की गेली दोन दशके त्या उच्च पातळीवरील राजकारणात सक्रिय आहेत आणि आता कदाचित या सर्वांतून मुक्त होण्याची वेळ आली आहे. गेली २० -२२ वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केल्यानंतर आता मला मोकळेपणा हवा आहे .भारत मला आवडतो आणि येथील रस्त्यांतून मनमोकळेपणाने, कोणताही लबेदा मागे नसताना मला हिंडायला आवडेल.
सुधारक अमेरिकेत महिला राजकारणातील वरीष्ठ पदावर विराजमान होताना दिसत नाहीत असे विचारले असता ६५ वर्षीय हिलरी म्हणाल्या, की तुमच्या देशात महिलांनी राजकारणातील अत्युच्च पदे दशकानुदशके भूषविली आहेत आणि हे माझ्या मते महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. पण अजून येथे बर्याच महिला शिक्षणापासून दूर आहेत. ज्या महिलांना कुटुंबाकडून त्यांची ध्येये पूर्ण करण्यासाठी पाठिंबा नाही, सुरक्षितता नाही त्यांच्यासाठीही कांहीतरी करता आले पाहिजे. आमच्याकडे शिक्षणाची परिस्थिती चांगली आहे पण राष्ट्राध्यक्षपदावर महिलांना हक्क सांगायचा असेल तर अजून खूप झगडा आम्हाला करावा लागणार आहे. महिलांसाठी राखीव कोटा भारताला उपयुक्त ठरला आहे पण अमेरिकेत त्याचा उपयोग होणार नाही. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविताना मला समाधान मिळालेच पण लोकांनी दिलेल्या मतांमुळेही मला खूप आनंद झाला. आमच्या येथील निवडणूक पद्धत विशेषतः महिलांसाठी थोडी अडचणीची आहे असे सांगून हिलरी म्हणाल्या की तेथे आम्हाला दोन रेस खेळाव्या लागतात. एक पैशांची आणि दुसरी मतांची. निवडणूक लढवायची तर लक्षावधी डॉलर्स जमवावे लागतात. मी थोडे जमविले आणि प्रचारासाठी लाखो डॉलर्स खर्च झाले. राष्ट्राध्यक्षपदाची रेस आम्हाला जिंकायची असेल तर अजून खूप प्रयत्न करावे लागणार आहे कारण हे काम एखादी कडक किवा अनब्रेकेबल काच तोडण्यासारखेच आहे.
