भारताचा मुष्टीयोद्धा देवेंद्रोला रौप्य पदक

अस्ताना, दि. ७ – भारताचा मुष्टीयोद्धा देवेंद्रो सिंह याने कझाकिस्तान येथे झालेल्या प्रेसिडेंट कप बॉक्सिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी नोंदविताना रौप्य पदकाची कमाई केली. क्यूबाच्या योसवानी वेईटीआ याच्याविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात देवेंद्रोला १५-११ असा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे त्याला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सामन्याच्या सुरूवातीच्या तीन मिनिटांमध्ये बरोबरीची स्थिती होती. मात्र त्यानंतर क्यूबाच्या मुष्टियोध्याने भारताच्या देवेंद्रोला पिढाडीवर टाकत अंतिम सामना खिशात घातला.
    हा अतिशय चुरशीचा सामना होता. क्यूबाच्या वेईटीआ याचे बचावतंत्र अतिशय निर्दोष होते, तो आपल्याला एकही गुण घेण्याची संधी देत नव्हता. पण आपण सध्याच्या कामगिरीवर खूष आहोत. ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टिकोनातून या दौर्‍यातून खूप काही शिकण्यास मिळाले, अशी प्रतिक्रिया देवंद्रो सिंह याने सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.