गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी पारधी समाजाचे उपोषण

मुंबई, दि. ७ – स्वातंत्र्यपूर्व काळापासून पारधी समाजावर होत असलेल्या अन्याय व पोलिसांच्या अत्याचाराविरोधात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हयातील भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कुंडलिक भोसले यांनी समाजातील अन्य ३५० जणांसह दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.
    महाराष्ट्र राज्य आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगते. परंतु, छत्रपतींनी ज्या समाजाला ईमानदार आणि शूर म्हणून गौरविले, त्यांनाच ब्रिटीश राजवटीत गुन्हेगार ठरविण्यात आले आणि स्वतःला कल्याणकारी म्हणविणार्‍या आजवरच्या कोणत्याही सरकारने या समाजावरचा गुन्हेगारीचा शिक्का अद्याप पुसलेला नाही, अशी व्यथा ज्ञानेश्‍वर भोसले यांनी हिंदुस्थान समाचारकडे व्यक्त केली. कोठेही चोरी, दरोडा असा कोणताही गुन्हा घडला की, प्रथम गावातील काही प्रतिष्ठित लोक व पोलीस पारध्यांनाच लक्ष्य करतात. त्यांना रात्री-अपरात्री पकडतात, अत्याचारही करतात. यातून पारधी समाजाच्या महिला देखील सुटत नाहीत. त्यांच्यावर पोलिसांसह, गावातील अनेकजण अत्याचार करतात, असे सांगून भोसले म्हणाले, सरकारकडे आजवर अनेक अर्ज विनंत्या करून देखील समाजाच्या बहुसंख्य मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
    पारधी समाजाला शासन रोजगार देत नाही. तसेच, कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ पारधी समाजास मिळत नाही. शासनाची आश्‍वासने केवळ कागदावरच राहिली आहेत, असा आरोपही ज्ञानेश्‍वर भोसले यांनी केला.
    पारधी समाजाला गावपातळीवर संरक्षण मिळावे, तंटामुक्त समितीवर या समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, त्याचप्रमाणे पारधी कुटूंबाना घरकुले, उपजीविकेसाठी शेतजमीन, मुलांना शिक्षण, शासकीय नोकरी, आदी विविध मागण्या भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त प्रतिष्ठानने केल्या आहेत.

Leave a Comment