कृष्णा पुनियाने रचला नवा राष्ट्रीय विक्रम थाळीफेक प्रकारात कमावले रौप्य पदक

हवाई बेटे, दि. ७ – भारतात झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत थाळीफेक प्रकारातील सुवर्णपदक विजेती कृष्णा पुनिया हिने, हवाई बेटांवरील मायुई आयलंड इथे झालेल्या थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करताना नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. कृष्णाने थाळीफेक प्रकारात ६४.७६ मीटर अंतरावर थाळीफेक करीत रौप्य पदक तर पटकावलेच; पण सीमा अंतिलेचा ६४.६४ मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम देखील मोडित काढला. कृष्णाला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र त्यानंतर तिने अनुक्रमे ५६.९६, ६४.७६, ६२.६८ आणि ६३.६८ मीटर्स अंतरावर थाळीफेक करीत रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिक विजेती अमेरिकन खेळाडू स्टिफनी ट्राफ्टन हिने स्पर्धेचे सुवर्ण पदक  पटकाविले. तर जिआ लिईसने कांस्य पदकाची कमाई केली. रौप्य पदक विजेती कृष्णा याआधीच लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. या स्पर्धेत ती स्वतःचाच विक्रम मोडीत काढणारी कामगिरी बजावेल, असा विश्‍वास तिचे पती आणि प्रशिक्षक विरेंद पुनिया यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment