ओसामाच्या कुटुंबकबिल्याची सौदीला रवानगी

इस्लामाबाद दि.२७- अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या तीन बायका आणि ११ मुलांना आज म्हणजे शुक्रवारी पहाटेच पाकिस्तानातून सौदी अरेबियात पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.
    मे २०११ मध्ये आबोटाबाद येथे अमेरिकेच्या सील कमांडोनी ओसामाचा खातमा केल्यानंतर त्याच्या बायका, मुले आणि कांही नातेवाईक पाकिस्तानात कस्टडीत होते. यांत दोन सौदी अरेबियन आणि एका येमेनीचाही समावेश होता. या सर्वांना आज कायदेशीररित्या सौदी अरेबियाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले.
   ज्या घरात ओसामाचे कुटुंबिय राहात होते तेथपासून ते बेनझीर भुट्टो आंतररराष्ट्रीय विमानतळापर्यंत आज प्रचंड पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. पाकिस्तानी न्यायालयाने दोन एप्रिल रोजीच ओसामाच्या विधवांना पंचेचाळीस दिवस तुरूंगवासाची शिक्षा दिली होती. पाकिस्तानात बेकायदेशीर रित्या प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या निकालापूर्वीच त्यांनी १ महिन्याचा तुरूंगवास भोगला होता व आता ही शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली असे संबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. या सर्वांच्या प्रवासासाठी कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने सरकारने त्यांची सौदीत पाठवणी करणे लांबविले होते असेही सांगण्यात आले.