आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या विकासदराबद्दल केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली दि.२८- स्टँडर्ड अँड पुअर पतमानांकन संस्थेने भारताची पत घटविली असतानाच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड )भारताच्या विकासाचा दर यंदा ६.९ टक्के इतकाच राहील असा अंदाज वर्तविला आहे.
  जानेवारी २०१२ मध्ये नाणेनिधीने भारताचा विकास दर ७ टक्के राहील असा अंदाज दिला होता आता मात्र यातही घट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
   खासगी आणि सार्वजनिक भागीदारीत प्रकल्प उभारणीला प्राधान्य दिले जाईल असे केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले असले तरी त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा अत्यंत मंदगतीने केल्या जात आहेत असे नमूद करतानाच प्रशासन ज्या मंदगतीने प्रकल्पांना मंजुरी देत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे. जागतिक अस्थैर्य आणि धोरणांमुळे उद्योगांनाही त्याची झळ बसते आहे त्यामुळे भारताने आर्थिक सुधारणा कार्याला अधिक गती देण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुचविले आहे.