एक्सझॉटिक फिश अँड बर्ड एक्स्पोचे उद्घाटन

पुणे, दि. २७ – फुटबॉल वर्ल्डकपमुळे प्रसिद्ध झालेला भविष्यवेत्ता ऑक्टोपस, दहा फूट उंच उडी मारून भक्ष् मिळविणारा अरोवाना मासा, माणसाच्या बोलण्याची नक्कल करणारा हॅन्डबर्ड पक्षी, असे अनेक वैविध्यपूर्ण अनोखे पक्षी-प्राणी असलेल्या एक्सझॉटिक फिश अँड बर्ड एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, आयोजक विनायक रासकर आदी उपस्थित होते. ई-पॉज एक्झॉटिक बर्डस् वेलफेअर सोसायटीच्या वतीने आयोजित प्रदर्शनात भारतातील १०० पेक्षा अधिक दुर्मीळ प्रजातींचे पक्षी आणि मासे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. यामध्ये समुद्राच्या तळाशी सापडणारे जेली फिश, लायन फिश, स्टिंग रे, क्लॉन, अशियन अरोवाना, ब्लॅक घोस्ट आदी प्रकारचे मासे. तसेच फिंचेस, ब्ल्यू गोल्ड मकाऊ, सिलव्हर-गिल्डन फिझन्टस, रंगीत कबुतरे आदी पक्षांचा समावेश आहे. याशिवाय प्राण्यांच्या आहार तज्ज्ञांचेही स्टॉल येथे ठेवण्यात आले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे दुरावलेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी घरच्या घरी राबविता येणजोगे काही उपाय योजनांबाबतही तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय हौशी छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथील खास वैशिष्टय ठरले आहे. येत्या  १ मे पर्यंत  सकाळी दहा ते दहा या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.