
नवी दिल्ली, दि. २७ – भारताला जागतिक हॉकीमध्ये अव्वल मानांकित संघाच्या तोडीस तोड संघ बनवायचा असेल, तर त्यांच्याशी सातत्याने सामने खेळण्याची गरज आहे, अशी भावना भारतीय पुरूष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकल नॉब्स यांनी व्यक्त केली.
लंडन ऑलिम्पिकसाठी तयारी कितपत आहे. याची पूर्वकल्पना येणार्या चार देशांच्या कसोटी शृंखलेतून भारताला कळेल, असेही नॉब्स यांनी सांगितले. लंडन येथे २ ते ६ मे दरम्यान होणार्या कसोटी मालिकेत भारत स्पर्धेचा आयोजक इंग्लंड, जगज्जेता आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता ऑस्ट्रेलिया आणि विद्यमान ऑलिम्पिक विजेता जर्मनी यांच्याशी आपले सामने होणार आहेत. या कसोटी मालिकेत भारताचा संघ जागतिक क्रमावरील असलेल्या अव्वल तीन संघाशी खेळणार असून, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीच्या दृष्टीकोनातून त्याचा नक्की फायदा होईल, असेही नॉब्स म्हणाले.
ऑलिम्पिक पात्रता सामन्यानंतर तीन आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये आम्ही आपल्या गती आणि ताकदीवर काम केले असेही नॉब्स म्हणाले. येणार्या मालिकेत आम्ही काही सामने जिंकण्याचा प्रयत्न करू. जमल्यास मालिकाही जिंकण्याचा प्रसत्न करू. पण सध्याच्याक्षणी हा अव्वल संघ मजबूत नाही, अशी कबुलीही नॉब्स यांनी दिली.
