सचिन राज्यसभेवर येणार?

नवी दिल्ली दि.२६- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावाची शिफारस राज्यसभेसाठी काँग्रेसतर्फे करण्यात आली असून खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच सचिनच्या नियुक्तीसंबंधात गृहमंत्रालयाला पत्र पाठविले असल्याचे समजते.
  सचिनने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सचिन कायमच राजकारणापासून दूर राहिला आहे आणि तो कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही त्यामुळे तो हा प्रस्ताव स्वीकारेल का नाही याबाबतच्या चर्चेलाही उधाण आले आहे.
   उद्या म्हणजेच शुक्रवारी आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हील्स यांच्यात लढत होत असून त्यासाठी सचिन दिल्लीत दाखल झाला आहे. आजच सकाळी त्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी अंजलीसह भेट घेतली. सचिनचे महाशतक झाल्यापासून सोनियांना त्याचे अभिनंदन करण्याची इच्छा होती व त्यामुळेच आज त्यांनी आपल्या निवासस्थानी सचिनला आमंत्रण दिले होते. यावेळी प्रियांका गांधी वढेराही उपस्थित होत्या. सचिननेही सोनियांजींना फिरोजशा कोटला मैदानावर सामना पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले असल्याचे समजते.
   सचिनच्या राज्यसभेवर नियुक्तीच्या प्रस्तावाचे वृत्त येताच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. त्यात भाजपच्या नेत्या व माजी राज्यसभा अध्यक्ष नजमा हेपतुल्ला, भाजप प्रवक्ते रवी शंकर प्रसाद यांच्याबरोबरच काँग्रेसचे संसदीय कामकाज मंत्री राजीव शुक्ला व रेणुका चौधरी यांचाही समावेश आहे.
  पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अभिनेत्री रेखा हिच्याही नावाची शिफारस राज्यसभेसाठी गृहमंत्रालयाकडे केली असल्याचेही वृत्त आहे.

1 thought on “सचिन राज्यसभेवर येणार?”

Leave a Comment