गोव्यात फुटबॉलच्या विकासासाठी जीएमए व विकास मंडळ प्रयत्न करणार

पणजी, दि. २२ – फुटबॉल हा गोव्याचा प्रमुख खेळ असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातून जाहीर केल्यानंतर, आता या खेळाच्या विकासासाठी गोवा फुटबॉल असोसिएशन व गोवा राज्य फुटबॉल विकास मंडळ यांनी संयुक्तपणे कंबर कसली आहे. राज्यात तळागाळात फुटबॉलचा विकास घडवून आणण्याचा निर्धार उभयतांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आला.
    गोवा फुटबॉल संघटनेचे (जीएमए) अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे व फुटबॉल विकास मंडळाचे सरकार नियुक्त अध्यक्ष डॉ. रूमिन मोंतेरो यांनी या बैठकीनंतर सदर माहिती दिली. गोव्यातील भारतीय जनता पक्षाने आपल्या निडणूक जाहीरनाम्यात, सत्तेवर आल्यास फुटबॉलला गोव्याचा प्रमुख खेळ घोषित करून या खेळाच्या विकासासाठी धडक कार्यक्रम हाती घेण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तेवर येताच पर्रीकर यांनी मांडलेल्या आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात हे आश्‍वासन तर पूर्ण केलेच. परंतु, या खेळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रूपयांची तरतूदही करून टाकली. या व्यतिरिक्त आणखी दहा कोटी रूपयेही त्यासाठी मंजूर करण्यात येणार आहेत.
    अलीकडच्या काळात फुटबॉलचा दर्जा खालावण्याचे कारण विचारले असता, मोसम सुरू होण्यापूर्वीच आम्ही राज्यसंघाची तयारी करायला हवी. संघ तयार करण्यासाठी वेळ लागतो. खेळाडूंना अधिक सरावाची गरज असते,  असे धेंपो म्हणाले. तर फुटबॉलच्या विकासासाठी गोव्याला परराज्यातून खेळाडू आयात करण्याची गरज पडू नये, असे डॉ. मोंतेरो यांनी स्पष्ट केले. राज्यात भावी काळात फुटबॉलच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जाणार असल्याचेही उभयतांनी यावेळी सांगितले.