`यापुढेही जगभरात भारताचे नाव उज्वल करणार’ कबड्डीपटू दिपीका जोसेफचे उद्गार

मुंबई, दि. २१ – `आम्ही खेळाडू आहोत. त्यामुळे आम्हाला भाषणाची सवय नाही. आम्हाला जे बोलायचे ते मैदानावरच बोलतो. आम्हा खेळाडूंचा सत्कार म्हणजे कबड्डीचा सत्कार केल्याने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. यापुढेही अशीच चांगली कामगिरी करुन भारताचे नाव जगभरात उज्वल करणार. त्यासाठी संपूर्ण भारतीयांचे आशिर्वाद आमच्या पाठिशी असू देत, ‘ असे उद्गार भारतीय महिला कबड्डी संघातील खेळाडू दिपीका जोसेफ यांनी शनिवारी येथे काढले.
    मुंबई महापालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी आंतरराष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत इरापला पराभूत करुन अजिंक्य मिळवून देणार्‍या भारतीय महिला कबड्डी संघातील महाराष्ट्राच्या तीन महिला खेळाडू दिपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात जाहीर सत्कार केला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना दिपीका जोसेफ यांनी वरीलप्रमाणे उद्गार काढले.
    या प्रसंगी ज्ञानराज निकम यांनी बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकारी, सदस्यांचाही सत्कार केला. मुंबई महापालिकेतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या क्रिकेटपटू, विक्रमवीर सचिन तेंडूलकर व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्याचे नियोजित केले आहे. या मान्यवरांसह या तिन्ही महिला कबड्डीपटूंचाही सत्कार महापालिकेतर्फे करावा, अशी सूचना मी पालिका सभागृहात महापौरांकडे केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच आपण या तिन्ही महिला कबड्डीपटूंचा सत्कार केला, असे विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी कॉंग्रेस पालिकेतील प्रमोद व नगरसेवक सुनिल मोरे हे उपस्थित होते.

Leave a Comment