हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार

पुणे, दि. १८ – नेपोलियन आणि अलेक्झांडर यांसारख्या राजांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द दैदीप्यमान आहे. मात्र, अन्य प्रदेशांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात आली. हा गैरसमज दूर करून महाराजांमधील विविध धाडसी कामांची ओळख जगाला करून देण्यासाठीच आगामी दोन वर्षांत हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ हा चित्रपट झळकेल, असा विश्‍वास चित्रपट निर्माते नितीन देसाई यांनी व्यक्त केला. आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन निर्मित ‘राजा शिवछत्रपती’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या विशेष खेळाचे सिटी प्राइड मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, यतीन कार्येकर आणि वैभव वाघ उपस्थित होते.
    देसाई म्हणाले, पाश्‍चात्त्य देश युद्ध कलेच्या अभ्यासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा वापर करत आहेत. मात्र, त्यांच्या अन्य कार्याबाबत पुरेशी माहिती जगभरात पोहचलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील इंग्रजी भाषेतील चित्रपट जगभरात पोहचेल त्या पद्धतीने मांडणी करायला पाहिजे, याबाबतचा एक प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवराज्याभिषेकदिनी या चित्रपटाचा मुहूर्त काढण्यात येणार आहे. मात्र, आताच्या ‘राजा शिवछत्रपती’ या चित्रपटाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतरच हे साध्य होऊ शकते.
    हा चित्रपट महाराजांच्या जीवनातील प्रत्येक घटनेवर प्रकाश टाकणारा असून, या चित्रपटातून शिवरायांचा खरा इतिहास आपल्याला पाहता येणार आहे. महाराष्ट्राला भावेल अशा पद्धतीचा ‘राजा शिवछत्रपती’ हा चित्रपट आहे.