कुर्ला येथे सिग्नल कॅबिनला आग, रेल्वेसेवा विस्कळीत, प्रवासी, डबेवाल्यांचे प्रचंड हाल

मुंबई, दि. १८ – विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सिग्नल कॅबिनला आग लागल्यामुळे मध्य रेल्वे – हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. त्यामुळे बुधवारी पहाटेपासून कामवर जाणार्‍या चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट होऊन घराबाहेर पडलेल्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी रेल्वे स्थानकात तर रेल्वे गाडीत अडकून पडले होते. या दुर्घटनेमुळे मुंबई विद्यापीठाच्या काही विषयांच्या परीक्षा बुधवारी देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा पोहोचण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी विद्यापीठाने या प्रकाराची दखल घेऊन परिक्षा केंद्रावर उशिराने पोहोचणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला.
आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी या आगीमुळे लोकल रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे तसेच चाकरमान्यांचे खूप हाल झाले. तसेच लोकल सेवा खोळंबल्यामुळे त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही जाणवला. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही खूप मोठा परिणाम दिसून आला.
दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा महत्वाच्या स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक स्टेशनवर असलेले सिग्नल काम करत नसल्याने प्रवाशांना रेल्वेच्या वेळेबद्दल योग्य माहिती मिळू शकत नव्हती. परंतु लोकल पास असलेल्या प्रवाशांना एक्सप्रेस गाडीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मध्य रेल्वे खोळंबल्याचा परिणाम हार्बर मार्गावरही झाला. मध्य रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी हार्बर मार्गाने जात होते. परंतु सीएसटीच्या दिशेने एकही गाडी सुटली नाही. विशेष म्हणजे वाहतूक खोळंबल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले. मुंबई विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बुधवारी परीक्षा असल्याने विद्यार्थी उशिरा परीक्षेला पोहोचल्यास त्यांना अधिक वेळ वाढवून देण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले होते.
    मुंबईची जशी रेल्वेसेवा लाईफलाईन म्हणून ओळखली जाते तशीच डबेवालाही एक मुंबईकरांचा अविभाज्य घटक बनले आहेत. या दुर्घटनेमुळे हजारो मुंबईकरांना आज जेवणाचा डबा न मिळाल्यामुळे त्यांना हॉटेचाच रस्ता धरावा लागला.  
    मध्य रात्रीपासून कोलमडलेली मध्य रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रसिध्दी प्रमुख जैन यांनी दिली. मध्य रेल्वेच्या रोजच्या १५७८ फेर्‍यांपैकी आज ७० टक्के फेर्‍याच होतील. उद्या हा टक्का आणखी वाढेल आणि परवा सगळ सुरळीत होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विजय मालेगावकर यांनी दिली.
मुंबई महापालिका मुख्यालयातील अधिकारी – कर्मचार्‍यांची कमी उपस्थिती
या दुर्घटनेमुळे मुंबई महापालिका मुख्यायालयात, मंत्रालयात तसेच सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती २० ते २५ टक्क्याने कमी होती. अनेक कर्मचारी उशिराने कामावर पोहोचले या सर्वांचा परिणाम पालिका कामकाजावर झाला.   

Leave a Comment