
मुंबई, दि. १७ – सिध्दिविनायक मंदिर परिसरातील अवैध दुकानांवर चार दिवसात कारवाई करुन अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकारने निवेदन सादर करण्याचे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार किरण पावस्कर यांनी संदर्भात विशेष उल्लेखाद्वारे ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली होती. त्यावर सभापतींनी सिध्दिविनायक मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दुकाने असल्याचे मान्य केले.
तसेच सिध्दिविनायक मंदिर परिसर हा अतिसंवेदनशील भाग असल्याने येथील दुकानांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. तसेच महापालिकेच्या जागेवर असणार्या अवैध दुकानांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली. तसेच पोलिस आणि महापालिकेने अशा अवैध दुकानांवर चार दिवसात कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईचे निवेदन सादर करण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले. यावेळी सरकारतर्फे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी निवेदन सादर करण्याचे मान्य केले.
