कामगारद्रोही वेतन कराराविरोधात बेस्ट कामगारांचे धरणे आंदोलन – विठ्ठलराव गायकवाड

मुंबई, दि. १७  – बेस्ट उपक्रमाबरोबर कामगार नेते शरद राव यांनी केलेल्या कामगारद्रोही वेतन करारामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे संतप्त कामगार आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासंदर्भात २० एप्रिल रोजी परळ येथील शिरोडकर सभागृहात आयोजित कामगारांच्या सभेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
    औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार बेस्ट उपक्रमावर पाच वर्षांसाठी वेतन करारापोटी ७४० कोटी रुपयांचा बोजा पडणार होता. मात्र, बेस्ट उपक्रमाने सदर निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर निर्णय होण्यापूर्वीच कामगार नेते शरद राव यांनी कामगारांचा विश्‍वासघात करुन २७ मार्च रोजी बेस्ट उपक्रमाबरोबर सामंजस्य करार केला.  
    या कारारामुळे बेस्ट उपक्रमावर १० वर्षांसाठी केवळ ५९० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, असे गायकवाड म्हणाले.
    या करारामुळे कामगारांना दरमहा केवळ ११०० रुपये वेतनवाढ मिळणार आहे. या करारामुळे कामगारांना अत्यल्प लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा सामंजस्य कराराचा प्रस्ताव बेस्ट समितीने मंजूर करु नये, असे गायकवाड म्हणाले.