
नवी दिल्ली, दि. १७ – भारतीय रिझर्व बँकेने मंगळवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याच्या कपातीची घोषणा केली आहे. या कपातीमुळे रेपो रेट दर ८ टक्के, तर रिझर्व्ह रेपो रेट दर ७ टक्के इतके झाले असल्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रशासक डी. सुब्बाराव यांनी २०१२-१३ या वर्षाचे पतधोरण जाहीर करताना सांगितले.
बँकेच्या रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेटमधील दरांच्या कपातीमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज देखील स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकेचा हा निर्णय म्हणजे सामान्य जनतेसाठीदेखील आनंदाची बातमी आहे. परंतु कॅश रिझर्व्ह रेशोवरील दर न बदलता ४.७५ टक्के एवढेच कायम आहे. दराच्या कपातीमुळे चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहणार असल्याची रिझर्व्ह बँकेला आशा आहे. विशेष म्हणजे या कपातीनंतर चालू आर्थिक वर्षात बँकेच्या कर्जात १७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०१३ मध्ये जीडीपी ग्रोथ ७.३ टक्के राहण्याचे अंदाज लावण्यात येत आहेत.
