नागपूर, दि. १७ – खुल्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देतानाच जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सल्ला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दास यांनी आयकर सेवेच्या प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणार्या अधिकार्यांना दिला. भारतीय महसूल सेवेच्या ६४ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ सोमवारी राष्ट्रीय प्रत्यक्षकर अकादमीत पार पडला. यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दास बोलत होते. यावेळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे महासंचालक डी. एस. सक्सेना उपस्थित होते.
ज्ञान आणि कौशल्यात निरंतर प्रगती करण्यावर भर देण्यासाबतच करदात्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन दास यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना केले. सत्यनिष्ठा, गौरव आणि सोपवलेल्या कामावर निष्ठा ठेवतानाच विभागाची प्रतिभा अधिक उज्वल करा, असे ते म्हणाले.
यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पदक दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विक्रम पगारिया यांना उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. आयकर सेवेच्या ६४ व्या तुकडीत १३९ प्रशिक्षणार्थी अधिकार्यांचा समावेश होता. देशातील १९ राज्यातून ते नागपुरात प्रशिक्षणासाठी आले होते. त्यात ३० अधिकारी उत्तर प्रदेशातील, राजस्थानचे १७, महाराष्ट्रातील १५, तामिळनाडूतील १४ अधिकार्यांचा समावेश होता. यातील ३२ टक्के प्रशिक्षार्थी ग्रामीण भागातून आले होते. या अधिकार्यांना १६ महिने अर्थशास्त्र, लेखाकर्म आणि प्रबंधनाचे धडे देण्यात आले.
