चंद्रपूर, दि. १४ – गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेली चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी संपली. त्यामुळे आतापासून उमेदवारांनी अंतिम व्यूहरचना आखणे सुरू केले आहे. मतदारापर्यंत थेट पोचण्याऐवजी मतविभाजन टाळू शकेल, अशा छोट्या उमेदवारांना प्रलोभने देऊन त्यांची मनधरणी करण्याचे प्रमुख उमेदवारांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
मनपा निवडणूक प्रचाराला कमी – अधिक प्रमाणात एक एप्रिलपासून सुरुवात झाली. प्रचारात रंगत आणण्यासाठी अनेक ज्येष्ठ नेतेही येथे येऊन गेले. कॉंग्रेसतर्फे मुख्यमंत्री चव्हाण, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही येथे प्रचारसभा घेतल्या. शुक्रवारी या प्रचारतोफा थंडावल्या. १५ एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात होणार आहे, तर दुसर्या दिवशी १६ एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात होणार आहे, तर दुसर्या दिवशी १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक नेत्यांनी अंतिम व्यूहरचना आखणे सुरू केले आहे.
घराघरांत पोहचून आवाहन करण्याऐवजी मतविभाजन करू शकेल, अशा उमेदवारांची मनधरणी सुरु केली आहे. यासाठी काही छोट्या उमेदवारांना आर्थिक प्रलोभनेही देणे सुरू केले आहे. या छोट्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यास विजयाच्या जवळ पोहोचू असे प्रमुख उमेदवारांचे गणित आहे.
