नागपूर, दि. १४ – एका प्रदर्शनासाठी शहराबाहेरून रेल्वेने आणलेला माल एका रेल्वे पोलिस निरीक्षकाने जकात चुकवून बाहेर नेला. हा प्रकार जकात विभागाच्या भरारीपथकाच्या लक्षात आल्यानंतर या रेल्वे पोलिस निरीक्षकांकडून १० पट दंड आकारण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.
या संदर्भात सविस्तर घटना अशी की, मनपा भरारी पथकाचे जकात निरीक्षक धुपे हे मानस चौकात वाहनांची तपासणी करीत होते. वाहन क‘मांक एमएच -३१ सीए २५४१ व एमएच ३१ सीआर ५८५२ हे दोन वाहन थांबवून त्यातील मालाची तपासणी केली. यापैकी एका वाहनावर भारत सरकार असे लिहिले होते. या दोन्ही वाहनात कापडाचे सात नग होते.
तपासणी करीत असतनाच रेल्वे पोलिस दलाचे एक उपनिरीक्षक आले व त्यांनी दोन्ही गाडीतील मालाची रेल्वे गेटपास दाखवून हा माल रेल्वे प्रशासनातील एका अधिकारी व त्यांच्या पत्नीचा असून तो घरगुती आहे, या महिला अधिकार्याचे नाव अर्चना सिंग असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये हा माल जात असल्याचेही सांगितले. भरारी पथकाला अधिक चौकशी केली असता संशय आल्यामुळे या पोलिस अधिकार्याचे पितळ उघडे पडले.
