विमानतळाच्या धावपट्टीला घालणार ‘सौर कुंपण’

नागपूर, दि. १४ – विमानतळाच्या धावपट्टीला रानटी जनावरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागपूर विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीला सौर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला असून,  हे कुंपण लावण्यासाठी निविदांची प्रक्रियाही सुरू झाली असल्याची माहिती विमानतळाचे वरिष्ठ संचालक व्ही. के. यादव आणि संचालक अशोककुमार वर्मा यांनी दिली.
    रानटी जनावरांचे धावपट्टीवर येणे रोखण्यासाठी अनेक महिने प्रयत्न सुरू आहेत. पण त्यावर ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही. मिहान इंडिया लिमिटेडने यासाठी एक आराखडा तयार केला असून, त्यानुसार ३२०० मीटरच्या धावपट्टीचा सौर कुंपणाच्या साह्याने जंगली जनावरांपासून बचाव करता येणार आहे. सौर कुंपणामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी सुरक्षित राहील, असा विश्‍वास मिहानला आहे.
    जंगली प्राण्यांपासून विमानांना होणारा अडथळा थांबवण्यासाठी जनावररहित धावपट्टी करण्यासाठी मिहानच्या प्रबंध संचालकांनी धावपट्टीच्या दोन्ही बाजूंनी सौर कुंपणासाठी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. ज्या कंपनीला या कामाचे कंत्राट मिळेल त्या कंपनीला आगामी पाच वर्षे या कुंपणाची देखभाल देखील करावी लागेल.