पुणे, दि. १३ – पुणे-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुणे-बेंगलोर महामार्गावर गोकुळ हॉटेल समोर घडला. यामध्ये अकप्पा सिध्दप्पा पुजारी (३७, बेळगाव) या चालकाचा मृत्यू झाला. तर क्लिनर संतोष बिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून बेंगलोरच्या दिशेने पुजारी हे त्यांचा ट्रक (केए २२ बी १०२६) घेऊन निघाले होते. दरम्यान, विरुध्द दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकची (एमएच १२, एफझेड ९१०६) समोरून जोरदार धडक बसली. यामध्ये अकप्पा पुजारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
