१६ एप्रिलला रिक्षाचा संप

पुणे|, दि. १३ – इलेक्ट्रॉनिक मीटरसक्तीच्या विरोधात येत्या १६ एप्रिल रोजी राज्यव्यापी बंद पाळण्याचा निर्णय रिक्षाचालक-मालक संयुक्त कृती समितीने घेतला आहे. तसेच याच दिवशी बेमुदत बंदबाबतचा निर्णय होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या बंदमुळे सोमवारी राज्यभरातील एकूण ४ लाख रिक्षा बंद राहणार आहेत.
    राज्याचे परिवहन आयुक्त शैलेशकुमार शर्मा यांच्यासमवेत समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये १६ एप्रिल रोजी राज्यभरातील रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, शरद राव, नितीन पवार उपस्थित होते. समितीच्या अहवालानुसार रिक्षाभाडे दरवाढ निश्‍चित केली जाते. मात्र, ही पद्धत अशास्त्रीय आणि तर्कविसंगत असल्याने त्याबाबत फेरविचार करण्यास शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. त्यासाठी समिती नेमण्यासही तत्त्वत: मान्यता देण्यात आली,  अशी माहिती पवार यांनी दिली. विद्यार्थी वाहतूक नियमावलीमध्ये सध्या रिक्षांचा समावेश करावा, रिक्षाभाडे वाढ योग्य प्रमाणात करण्यात यावी, इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात येणार आहे.
    दरम्यान, काल महाराष्ट्र रिक्षा संघटनेनेही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसा निर्णय कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करताना राज्य शासनाने मोफत मीटर द्यावेत, रिक्षा व्यावसायिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांना भरावा लागणारा कर,  दंड आणि इन्शुरन्सची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करावी, आदी मागण्याही महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नाना  क्षिरसागर यांनी बैठकीत केल्या.

Leave a Comment