पुणे जिल्हा झाला पोलिओमुक्त

पुणे, दि. १३ – पल्स पोलिओ लसिकरण मोहीम यशस्वीरित्या राबवल्यामुळे १९९९ पासून आजपर्यंत जिल्ह्यात एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही. ही मोहीम १९९५ पासून सुरु झाली आहे. तसेच २०११ मध्ये पुणे जिल्हा पोलिओ मुक्त झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच वर्षाखालील बालकांना जवळच्या पोलिओ बुथवर लस देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 
    पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोकाणे, राष्ट्रीय पोलिओ दक्षता प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी अरविंद नरुला आदी उपस्थित होते.  
मात्र, शेजारील पाकिस्तान, अफगानिस्तान आणि नायजेरीया आदी देशात पोलिओचे रुग्ण आढळल्याने भारतात कायमस्वरुपी दक्षता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
उद्या जिल्ह्यात पल्स पोलीओ लसिकरण मोहीम
रविवारी सकाळी ८ ते ५ या वेळेत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण भागात ५ वर्ष वयोगटातील सुमारे ४ लाख ६७ हजार ७०८ बालके आहेत. लसीकरण मोहिमेंतर्गत लस देण्यासाठी एकूण ३ हजार ९०४ पोलिओ लसिकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच घरोघरी जाऊन पोलिओचा डोस देण्यासाठी एकूण २ हजार ८३४ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच टोलनाका, एस.टी, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळे, वीटभट्टी, बांधकाम मजूर वस्ती, खान परिसर,  ऊसतोड कामगार वस्ती, साखर कारखाने आदी ठिकाणी बालकांना लस देण्याची विशेष सोय करण्यात आली आहे.

Leave a Comment