महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली वैशाली जाधव

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या `ढोलकीच्या तालावर’ या अनोख्या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने नाशकात संपन्न झाला.  १२ लावण्यवतींमध्ये रंगलेली ही चुरशीची स्पर्धा ’वैशाली जाधव’ हिने जिंकली आणि एकच जल्लोष झाला.  चार लावण्यवतींमध्ये रंगलेला सामना `वैशाली जाधव’ने आपल्या बहारदार सादरीकरणाने जिंकला आणि सोबत भरघोस बक्षिससुद्धा.
 १ लाख ४५ हजार ६७९ एसएमएस मधून ५६ टक्के एसएमएस मिळून वैशाली जाधव ही महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी बनली. वैशाली जाधव हिला ई टिव्हीतर्फे ५ लाख रुपयांचा चेक, सोन्याची ट्रॉफी, थॉमस कुकतर्फे १२ दिवसांची अमेरिका ट्रीप आणि `ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांच्या आगामी `मालक’ या चित्रपटात खास लावणी सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
प्रथम उपविजेती ठरण्याचा मान स्नेहा वाघला मिळाला.  द्वितीय उपविजेतीचा मान सोनाली पवारला मिळाला. ढोलकीच्या तालावरच्या अंतिम सोहळयाचं खास आकर्षण ठरली अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आणि अमृता सुभाष यांचे परफॉमन्स.  कार्यक्रमातील परिक्षक सुरेखा पुणेकर यांनीही तमाशातील मुजरा आणि लावणी सादर करुन कार्यक्रमाला चार चॉंद लावले. लावणीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले त्या शांताबाई सातारकर, शकुंतलाबाई नगरकर, सरला नंदुरीकर आणि गुलाबताई संगमनेरकर या मान्यवरांचा सत्कार विश्वास पाटील, प्रकाश पाटील, श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.