एअरटेलने केला ४ जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ

कोलकाता, दि. १० – देशात सर्वप्रथम ४जी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करण्याचा मान भारती एअरटेल कंपनीला मिळाला आहे. वायरलेस इंटरनेट अॅक्सेसच्या माध्यमातून एअरटेलने प्रथम कोलकाता शहरात या सेवेला प्रारंभ केला असून, लवकरच बंगळुरू (कर्नाटक सर्कल), चंदीगढ (पंजाब सर्कल) आणि पुणे (महाराष्ट्र आणि गोवा सर्कल) शहरातील एअरटेलच्या ग्राहकांना देखील या सेवेचा लाभ घेता येईल. 
सेकंदाला १०० मेगाबाईट्स (एम.बी.) डाउनलोड स्पीड तर सेकंदाला ५० एम.बी. अपलोड स्पीड हे या ४ जी इंटनेट सेवेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आता मोठे चित्रपट, यू ट्यूब व्हिडिओ, मोठ्या आकाराचा डेटा डाउनलोड अथवा अपलोड अतिशय वेगाने करणे शक्य होईल. ब्रॉडबँड सेवेत मोठी क्रांती घडवू शकणारे हे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध असलेल्या ३ जी तंत्रज्ञानापेक्षा किमान पाचपट वेगाने काम करील.
एअरटेलने या तंत्रज्ञानासाठी सुमारे ३३०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून, चीनच्या झेडटीई या टेलिकॉम कंपनीचे सहाय्य घेतले आहे. या सेवेच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग करणे शक्य असले तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एअरटेलने सध्या ४ जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑडिओ तसेच व्हिडिओ कॉलिंग करण्यावर बंदी घातली आहे.

Leave a Comment