पाकिस्तानातील हिंदू जगत आहेत लाचारीचे जीणे

लाहोर, दि. १० – जबरदस्तीने होणारे धर्मांतर व हिंदू कुटुंबातील महिलांवर होणारे अत्याचार यामुळे त्रस्त झालेला पाकिस्तानातील हिंदू समाज सरकारी उदासीनतेमुळे अक्षरशः हतबल झाला आहे.
पाकिस्तानातील हिंदू मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सतत कानावर येणार्‍या जबरदस्ती धर्मांतराच्या व हिंदू युवतींच्या अपहरणाच्या घटनांमुळे हिंदू समाजात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. परंतु, पाकिस्तानी सरकारकडून या घटना रोखण्यासाठी कोणतीही सकारात्मक उपाययोजना होताना दिसत नाही. बळजबरीने केलेले धर्मांतर रोखण्यासाठी हिंदू समाजाने सरकारकडे कठोर कायद्याची मागणी केलेली आहे.
पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष जोहरा युसुफ यांनी पाकिस्तानातील हिंदू समाज घाबरलेला नसून, तो नाराज आणि असहाय्य झाला असल्याचे सांगितले. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात हिंदू तरूणींचे पैशांसाठी अपहरण, बळजबरीने केलेल्या धर्मांतराच्या अनेक घटनांची नोंद सरकारकडे आहे. नुकतेच एक प्रकरण येथील उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. बळजबरीने धर्मांतर झालेल्या एका हिंदू युवतीने आपल्याला पुन्हा आपल्या कुटुंबियांकडे जाण्याची इच्छा असल्याचे न्यायालयास सांगितले असल्याचे युसुफ यांनी सांगितले.
पाकिस्तानातील १७ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे साडेपाच टक्के लोकसंख्या हिंदू धर्मिय आहे. यातील बहुतांश समाज हा सिंध प्रांतामध्ये वास्तव्यास असून, उर्वरीत समाज बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतात राहतो. पाकिस्तानातील काही राजकीय पक्ष व हिंदू संघटना देखील हिदूंवरील अत्याचामुळे व्यथित असून, रविवारी या पक्ष-संघटनांनी एकत्रितपणे कराची येथे पत्रकार परिषद घेऊन हिदूंवरील अत्याचारांना वाचा फोडली. पाकिस्तानात काही ठिकाणी हिंदू समाजावरील अत्याचारांच्या विरोधात धरणे आंदोलने देखील केली जात असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Leave a Comment