विजेंदरने निश्चित केले लंडन ऑलिम्पिकचे तिकीट

अस्ताना, दि. ८ – बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारा भारताचा आघाडीचा मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह याने यावर्षी होणार्‍या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी आयोजित करण्यात आलेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत त्याने मंगोलियाच्या चुलुनटूमूर तुमूखुयाग याचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारतानाच आपला ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश देखील निश्चित केला.
  नुकत्याच झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर विजेंदर सिंह करिता ऑलिम्पिक स्पर्धेस पात्र ठरण्याची ही शेवटची संधी होती. तुमूखुयागचा पराभव केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विजेंदरने टीकाकारांना आपण चोख उत्तर दिल्याचे सांगितले. आपण स्वतःला सिद्ध केले असून, आता लक्ष्य आहे ते ऑलिम्पिक विजयाचे, असे तो म्हणाला. विजेंदरच्या या कामगिरीमुळे लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीबाबत आशा उंचावल्या आहेत.

   

Leave a Comment