ग्रेस यांच्याबाबत साहित्य संस्था असंवेदनशील – अनिल अवचट

पुणे, दि. ८ – विलक्षण, प्रतिभावंत आणि जगावेगळा माणूस म्हणजे कवी ग्रेस. अशा श्रेष्ठ कवीला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने दिले गेले नाही. आपल्या साहित्य संस्था इतक्या असंवेदनशील कशा असू शकतात, असा सवाल उपस्थित करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी ग्रेस यांच्याविषयीच्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कवी ग्रेस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत डॉ. अनिल अवचट बोलत होते. यावेळी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, श्रीनिवास वारूंजीकर, डॉ. नीलिमा गुंडी, चित्रकार  रविमुकुल, संजय भास्कर जोशी आणि चंद्रकांत  वानखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. अनिल अवचट म्हणाले, ग्रेस हे माझ्यासाठी आधी मित्र होते.          नंतर त्यांना कवी म्हणून मी ओळखतो. मनस्वीपणे जगणार्‍या आणि लिहिणार्‍या ग्रेस यांच्या साहित्याचे मूल्य कधीच कोणाला समजले नाही. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा त्यांच्यातील कवीला नसून तो ललित लेखकाला आहे हाच मोठा विनोद आहे. ग्रेस यांचे साहित्यरूपी स्मारक साकारले जावे.
डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, ग्रेस हा मनस्वी कलावंत आणि आत्ममग्न कवी होता. त्यांच्या कविता दुर्बोध नाहीत. तर, या कविता समजून घेण्यास आपणच कमी पडलो.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ग्रेस यांचे काव्य अनुभूतीच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारे होते. त्यांच्या कवितांशी एकरुप झाल्यानंतर या शब्दकळेचा परिचय झाला आणि ते काव्य आपल्याशी संवाद साधणारे आहे याची जाणीव झाली.

Leave a Comment