फुलविक्रेती महिला करतेय मुलींचीही विक्री

नाशिक, दि. ८ – शहरातील राम वाडी परिसरातील हनुमान मंदिराजवळ फुलविक्री करणारी जया शर्मा नावाची एक महिला गरीब कुटुंबातील मुलींची विक्री करीत असल्याच्या वृत्तामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    काही दिवसांपूर्वीच लोणार गल्लीतील एका गरीब कुटुंबातील मुलीला औरंगाबाद येथे विकल्याचे प्रकरण ताजे असतानाच रामवाडी परीसरातून जया शर्मा हिने  ’मुलीचे कल्याण होईल’ असे त्या मुलीच्या गरीब पालकांना सांगून, सदर मुलीचा धीरज सोनी या श्रीमंत कुटुंबांतील मुलाशी दोन लाख रुपये घेउन विवाह लावून दिल्याचे उघडकीस आले आहे.
    सदर मुलीचा लग्नानंतर सासरी भयंकर होणारा छळ व दोन लाख रुपये माहेरुन घेवून यावेत, याकरिता दिल्या जाणार्‍या त्रासाला वैतागून  मुलीने आपल्या पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर या पिडीत मुलीचे पालक मुलीच्या सासरी गेले. तेव्हा सासरच्या लोकांनी लग्नापूर्वी मध्यस्थ जया शर्मा हिने वरपक्षाकडून दोन लाख रुपये घेतल्याचे असल्याचे सांगितले, तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला.
    सदर घटनेसंदर्भात मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पती धीरज सोनी, सासरे दयाराम सोनी, सासू सुधा सोनी, चुलत सासरे भरत सोनी तसेच जया शर्मा हिच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. जया शर्मा हिचे मनमाड, धुळे, औरंगाबादसह गुजरात आणि राजस्थान येथे देखील तरुणी विक्री प्रकरणात संबध असण्याची शक्यता आहे. पोलिस तिच्या शोधात असून ही महिला सध्या फरार असल्याचे समजते.
    मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी झालेले प्रमाण हेच अशा घटनांस कारण असून गुजरात, राजस्थान येथून अनेक जण लग्नासाठी मुली शोधत नाशिकला येत असतात. ते वधू पक्षाला पैसे देऊन लग्न जमवितात, असेही आता समोर येत आहे.
    गरीब समाजातील लोकांना तुमच्या मुलीचे कल्याण होईल असे आमीष दाखवून हे दलाल भुलवितात व मुलगी श्रीमंताच्या पदरी बांधून देण्याच्या सोहळ्यात आपले आर्थिक हित साधतात असे प्रकार अनेक प्रकार उघडकीस आल्याने आता वधू उपलब्ध करुन देणार्‍या गुन्हेगार साखळीच्या पाठीमागे दडलेले बडे मासे कोण? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Leave a Comment