गणपतीबाप्पांसाठी यंदा मोजावे लागणार जादा पैसे

पुणे दि.७- एप्रिल मेचे दिवस म्हणजे जसे उन्हाळ्याचे दिवस तसेच हे दिवस आहेत गणपती उत्सवाकरिता मूर्ती तयार करण्याचे दिवस. यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील करात साडेबारा टक्के वाढ करण्यात आली असल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमती किमान ३० टक्क्यांनी तरी महागणार असल्याचे गणपतीमूर्तींचे कारखानदार सांगत आहेत.
   गणपती उत्सवासाठी गणपतीच्या मूर्ती तयार करायला चैत्री पाडव्यापासूनच सुरवात केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत मूर्ती तयार करून त्या पूर्ण वाळविल्या गेल्या की रंगरंगोटी करून ऐन उत्सवात मूर्ती ग्राहकांना उपलब्ध करून देता येतात. राज्यात पेण येथील मूर्ती अतिशय प्रसिद्ध असून एकट्या पेणमध्येच या मूर्ती बनविण्याचे जवळपास चारशे कारखाने आहेत. दरवर्षी येथे ३० ते ३५ लाख मूर्ती बनविल्या जातात. आत्तापर्यंत सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असले तरी आता मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमतीत वाढ झाली आहे. महागाईमुळे रंगाचे दरही चढेच आहेत तसेच कुशल आणि अकुशल कामगारांची मजुरीही वाढली आहे. अकुशल कामगाराला दिवसांला २५० रूपये तर कुशल कामगाराला दिवसाला ५५० रू. मजुरी द्यावी लागते आहे. शिवाय मूर्ती परगावी पाठविताना वाहतूक खर्च विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत गणपतीबाप्पांच्या मूर्तींचे दर किमान ३० टक्के वाढतील असे येथील कारखानदार सांगत आहेत.
  कारखानदार दीपक समेळ यांच्या सांगण्यानुसार येथील मूर्तींचे दर उंचीनुसार ठरतात. सहा इंची मूर्तीसाठी यंदा किमान ८० रू. जागेवरच मोजावे लागणार आहेत तर १२ फुटी मूर्तींसाठी किमान १७ ते १८ हजार रूपये जागेवरच दर पडेल. घरोघरी बसविल्या जाणार्‍या मूर्ती या साधारण १ ते दीड फुटी असतात. त्यासाठी ग्राहकांना २०० ते २५० रूपये मोजावे लागणार आहेत.