स्टंटबाजी करणार्‍या कलाकाराचा मृत्यू, अभिनेत्री सायली भगत घायाळ

नोएडा, दि. ७ – ग्रेट अॅडव्हेंचर मॉलच्या उद्धाटन कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या एका स्टंट कार्यक्रमात अतिउंचीवरून कोसळलेल्या शैलेंद्र नामक कलाकाराचा मृत्यू झाला. तर अभिनेत्री सायली भगत आणखी एका अपघातात जखमी झाली. विशेष म्हणजे या मॉलचे उद्धाटन केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांच्या हस्ते झाले व त्यांच्या उपस्थितीत देखील सदर कलाकारांनी अनेक धाडसी स्टंट्स केले होते. स्टंट करताना आवश्यक सुरक्षा उपाय न योजल्यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  मॉलच्या इमारतीच्या बाहेरच्या बाजूने दोर बांधून त्यावर चढणारा (रॅपलिग) शैलेंद्र हा कलाकार त्याचा सुरक्षा पट्टा तुटल्यामुळे जवळपास सातव्या मजल्याच्या उंचीवरून जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. हिदी चित्रपट अभिनेत्री सायली भगत ही देखील बाईक स्टंट करीत असताना झालेल्या अपघातात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सुरक्षा उपायात ढिसाळपणा झाल्यामुळेच हे अपघात झाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, त्यासाठी या स्टंट्सच्या व्हिडिओ फुटेजचा आधार घेतला जात आहे.

Leave a Comment