लवासा सिटीसाठी गुंतवणूदारांची झुंबड

पुणे दि.७- पुण्याजवळच्या लवासा सिटीतील पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेली सर्व अपार्टमेंटस विकली गेली असून आता पहिल्या टप्प्यातीलच मूगांव येथे बांधण्यात येणार्‍या घरांसाठीही आत्ताच वेटींगलिस्ट तयार झाली असल्याचे समजते.
  पर्यावरणवाद्यांकडून झालेला विरोध, स्थानिक आदिवासींची फसवणूक झाल्याचे आरोप या व अशा अनेक कारणांनी लवासा सिटी प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. केंद्रीय पर्यावरण विभागानेही या प्रकल्पाची पाहणी करून पर्यावरण नियमांचा भंग झाल्याचे मान्य करून येथील बांधकामे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रीच बदलले गेले आणि हे ठप्प झालेले काम कांही अटींवर पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविताच अवघ्या दोन महिन्यात पर्यटक आणि गुंतवणूकदारांचा प्रचंड ओघ या प्रकल्पाकडे सुरू झाला आहे.
  स्वातंत्र्यानंतरचे भारतातले पहिले प्लॅन्ड हिल स्टेशन अशी जाहिरात करण्यात आलेल्या या प्रकल्पाची मूळ कल्पना होती कृषी मंत्री शरद पवार यांची. एकूण पाच टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून त्यातील पहिल्या टप्प्यात दासवे आणि मूगांव ही शहरे विकसित करण्यात येणार आहेत. पैकी दासवे येथील बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे अपार्टमेंटस, हॉटेल्स, दुकाने अशा ३००० मालमत्ता आहेत. त्यासाठी ३५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली असून या सर्व तीन हजार मालमत्ता विकल्या गेल्या आहेत. आता मूगांव येथे विकासकामांची सुरवात होत आहे, तोपर्यंतच तेथील मालमत्तासाठी प्रतीक्षा यादी तयार झाली असल्याचे लवासा कार्पोरेशनचे ग्रुप प्रेसिडेंट राजगोपाल नोगिया यांनी सांगितले.
  लवासा सिटीचा हा प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा पूर्ण होण्यासच २०१६ साल उजाडणार आहे. सध्या पर्यावरण मंत्रालयाने पहिल्या टप्प्याचीच परवानगी दिली असली तरी पुढील टप्प्यांसाठीही परवानगी मिळेल अशी खात्री कार्पोरेशनकडून दिली जात आहे. त्यातच आता मूगांव येथे येण्यासाठी मुंबईहून लोणावळा मार्गे बोगदा आणि रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईहून येथे येण्याची वेळ आणि अंतर कमी होणार आहे. सध्या पुण्यातील चांदणी चौकातूनच या प्रकल्पाकडे जाता येते. तसेच मूगाव येथे आय टी व सॉफ्टवेअरसाठी विशेष क्षेत्र ठेवण्यात आले असून या गांवात २ हजार अपार्टमेंटस तयार होणार आहेत. सध्या येथील निवासी जागेचा दर प्रतिफूट साडेतीन ते चार हजार रूपये आहे.
   हा प्रकल्प हाती घेतलेले हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अजित गुलाबचंद म्हणाले की वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी नागरी सुविधा हा आपल्यापुढील मोठा प्रश्न आहे. सध्याच्या शहरांवरील ताण कमी करायचा असेल तर देशात भविष्यात किमान ५०० नवी शहरे वसविली गेली पाहिजेत. लवासा प्रकल्प त्यासंदर्भात पथदर्शक ठरेल अशी आम्हाला आशा आहे.
———

Leave a Comment