हरवलेली वाहने शोधणारे पोर्टल तयार

मुंबई, दि. १७ – हरवलेली किवा चोरीला गेलेली वाहने शोधण्यासाठी आता वेब पोर्टलचा मदतीचा हात मिळणार आहे. मिसिंग व्हेईकल पोर्टल त्यासाठी सज्ज असून चोरीला गेलेल्या वा हरवलेल्या किंवा सापडलेल्या वाहनांची माहिती आता या पोर्टलवर मिळू शकणार आहे. पुण्यातील जी. एन. सेल्युशन प्रा. लि. या कंपनीने हे वेब पोर्टल तयार केले आहे.
डब्ल्यूडब्ल्यू.मिसिंग व्हेईकल.को.इन या नव्या पोर्टलची मदत पोलीस विभाग, विमा कंपन्या व सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. राज्यातील कुठल्याही भागातून चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध घेणे या पोर्टलमुळे शक्य होणार आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. हरविलेल्या किवा चोरीला गलेल्या वाहनांची माहिती देणा-यास कंपनीकडून बक्षीसही मिळणार असून या महितीचा दुरूपयोग केला जाणार नसल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मिसिंग व्हेईकल पोर्टलवर चोरीस गेलेल्या अथवा सापडलेल्या वाहनांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सापडलेल्या वाहनांमधील आपल्या वाहनांची ओळख पटविणेही सोपे होणार आहे. हरविलेल्या वाहनांमध्ये आपले वाहन नसल्यास वेब पोर्टलवर हरविलेल्या वाहनांचा तपशील पुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे हरविलेले वाहन सापडल्यास, असलेल्या माहितीची पडताळणी करून कंपनी वाहन मालकांशी संपर्क साधू शकेल असेही कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
चोरीला गेलेल्या वाहनांच्या मालकाने आपले नाव, वाहन नोंदणी क्रमांक, चेसी क्रमांक, मॉडेल, वाहन खरेदीचा तारीख, इन्शुरन्स पॉलिसीचा क्रमांक, वाहन कोठून चोरीस गेले याचा तपशील तसेच चोरीस जाण्याची वेळ, वाहन चोरीसंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीचा एआयआर क्रमांक, संपर्क क्रमांक मिसिंग व्हेईकल पोर्टलवर नोंदविणे आवश्यक असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतरच वाहन मालक वेब पोर्टलवर उपलब्ध असलेल्या वाहनांचा तपशील पाहू शकेल. या यादीत त्यांच्या वाहनाचा समावेश असल्यास कंपनीकडून त्यांना मेल पाठविला जाणार असून त्यानंतर वाहन ताब्यात घेण्यासाठी पोर्टलच्या प्रशासकीय विभागाशी संपर्क साधावा लागेल असेही कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.