विलासराव देशमुख राज्यसभा निवडणूक रिंगणात

मुंबई, दि. १७ – केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी राज्यसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. विविध कारणांनी गेल्या काही दिवसांपासून देशमुख सतत भ्रष्टाचाराच्या संशयाच्या सावटाखाली असल्याने त्यांनी सादर केलेल्या संपत्तीविषयक विवरणाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
माजी मुख्यमंत्री असणारे विलासराव देशमुख यांनी स्वतःच्या नावे सहा कोटी रूपये तर पत्नी वैशाली यांच्या नावे स्थावर जंगम सात कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. देशमुख यांच्या शिवाय काँग्रेस पक्षाने केंद्रीय राज्यमंत्री राजीव शुक्ला यांची राज्यसभेवर फेरनियुक्ती निश्चित झाली असून शुक्ला सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शनिवारी विलासराव देशमुख यांनी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह काँग्रेस राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हजर होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विलासराव देशमुख यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने केंद्र सरकारकडे सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी ‘भारतरत्न’साठी शिफारस करणा-या यादीत खेळाडुंचा समावेश नव्हता. मात्र, आता तो करण्यात आल्याने मुंबई क्रिकेट संघटना सचिनसाठी शिफारस करणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment