कोकणातली साठमारी

नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आता कोणाशी घरोबा करावा याबाबत त्यांचा काही निर्णय झाला नव्हता.अर्थात त्यांना दोनच पर्याय होते.पहिला काँग्रेसचा आणि दुसरा राष्ट्रवादीचा. तेव्हा त्यांनी आधी पवारांची पालखी उचलायची तयारी दाखवली पण पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याऐवजी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादीत येण्यापेक्षा काँग्रेस मध्ये जाण्याने त्यांना पुढे चांगले चान्सेस मिळतील असे पवारांनी त्यांना पटवले. खरे तर पवारांना राणे यांच्या रूपाने शिवसेनेचा ढाण्या वाघ आयताच मिळत होता आणि कोकणात सहजतेने पाय रोवता येत होते. पण त्यांनी राणे यांना टाळले. आता आता त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही टाळले. त्यांना पक्ष वाढवायचा आहे पण आपल्यापेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी नेते पक्षात घ्यायचे नाहीत. राणे यांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले असते तर काय झाले असते याचे दर्शन आता आपल्याला घडतच आहे. राणे राष्ट*वादीत आले असते तर त्यांनी आपल्या कोकणातल्या वजनाचा उपयोग करून राष्ट*वादी काँग्रेसला बाजूस सारून स्वतःचेच साम्राज्य वाढवले असते.

आता ते काँग्रेसमध्ये राहून तेच करायला लागले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे नेते तर  उठून उभे राहिलेच आहेत पण कोकणात येत्या नगर पालिकांच्या निवडणुकांत राणे विरुद्ध सर्वजण असा सामना रंगायला लागला आहे. पवारांचे राणे यांना टाळणे ही किती बरोबर होत हे आता लक्षात यायला लागले आहे. राणे यांनी आधी आपल्या सिधुदुर्ग जिल्हयात काँग्रेसच्याच नेत्यांना बाजूस सारले. या जिल्हयात काँग्रेस म्हणजे नारायण राणे असे समीकरण तयार करण्याचा घाट घातला. त्यामुळे आता तिथल्या काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी राणे विरोधी आघाडी संघटित करायला सुरूवात केली आहे. राणे यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघात आपला मुलगा डॉ, नीलेश राणे याला निवडून आणले आणि आता नगर पालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हाही राणेमय करायला सुरूवात केली. पण रत्नागिरीत  राष्ट*वादीचे नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव हे ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी राणे यांच्या या वाढत्या प्रभावाला आव्हान दिले आहे. जाधव आणि राणे दोघेही पूर्वीं  शिवसेनेतच होते. राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यानंतर एकाच वर्षात जाधव यांनी  शिवसेना सोडून राष्ट*वादीत प्रवेश केला. राणे आपल्या गावात येऊन त्यांचे वजन वाढवत आहेत असे दिसताच जाधव यांनी त्यांना अटकाव केला.

एकेकाळी शिवसेनेत एकत्र काम करणारे हे दोघे नेते एकेकाळी एकत्रच असलेल्या दोन निरनिराळ्या पक्षात जाऊन एकमेकांच्या उरावर बसायला लागले आहेत. चिपळूणमध्ये जाधव आणि राणे यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला असून चिपळूणला रणभूमीचे  स्वरूप आले आहे. आता आपल्या लोकशाहीने टोळ्यांच्या  राज्याचे स्वरूप धारण केले आहे. पवार टोळी आणि राणे टोळी (त्यालाच थोड्या बर्‍या भाषेत पवार घराणे विरुद्ध राणे घराणे असे म्हटले जाते) यांच्यात मुख्य झगडा आहे. जाधव आपली थोडीशी कुमक घेऊन पवार टोळीच्या आश्रयाला आले आहेत. तशी राणे टोळी अनेकांना नकोशी झाली आहे. त्यांच्या पक्षातलेच नेते राणे यांना संपवायला बसले आहेत. त्यांनीही पुष्पसेन सावंत यांना म्हणजे आपल्या पक्षातल्या मालवणकरांना राणे यांचा काटा काढण्याची सुपारी दिली आहे. आता राणे तिथे सावंत आणि जाधव या दोन शत्रूंशी एकाच वेळी लढत आहेत. राणे हे स्वतःला लोकांत राहून लोकांची कामे करणारा नेता म्हणवतात पण त्यांच्याकडे मुत्सद्दीपणा नावाचा काही गुण मुदलातच नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी शिवसेनेत बरीच प्रगती केली होती. त्यांचा स्वभाव, राडा करण्याची ताकद, भाषा आणि कोणत्या वेळी काय बोलावे याचे भान न ठेवता बोलण्याची रीत यामुळे त्यांची शिवसेनेत चांगलीच प्रगती झाली. ते सुरूवातीला शाखा प्रमुख होते पण  चढत चढत मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले. तिथे त्यांना करमेना. उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा सहन होईना म्हणून ते बाहेर पडले. तिथे ते वर चढले होते. इकडे आल्यावर खाली उतरायला लागले. मुख्यमंत्र्याचे महसूल मंत्री आणि महसूल मंत्र्याचे उद्योग मंत्री झाले. आता त्यांना त्याही पदावरून खाली खेचण्याचे कारस्थान सुरू झाले आहे. शिवसेनेत ज्या स्टाईलने त्यांना वर चढवले त्याच स्टाईलमुळे ते काँग्रेसमध्ये खाली उतरायला लागले आहेत. मित्र कसे गमवावेत आणि वेगाने नव नवे शत्रू कसे निर्माण करावेत यात ते वाकबगार आहेत. शरद पवार यांचे सगळ्या पक्षात मित्र आहेत. जिथे जाल तिथे पवारांचा कोणी तरी मित्र सापडतोच पण राणे यांचा प्रकार वेगळा आहे. जिथे जाल तिथे राणे यांचा एखादा तरी शत्रू सापडतोच. राणे यांना संपवण्यास सारेच उत्सुक आहेत पण ते साहस कोणी करू शकत नव्हते पण आता जाधव यांच्या रूपाने राणेंच्या डोळयाला डोळा भिडवणारा कोणी तरी उभा रहात आहे हे दिसताच राणे यांचे झाडून सारे शत्रू एकत्रित होण्यास सुरूवात झाली आहे त्यामुळे राणे यांचा परतीचा प्रवास वेगाने सुरू होतो की काय हे पालिका निवडणुका ठरवणार आहेत.

Leave a Comment