मुंडे यांचा सूर निवळला

भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या व्यथा,वेदना सांगण्यासाठी पाचारण केलेले आहे.अशा बैठकीमध्ये मुंडे पक्षश्रेष्ठींना निरुत्तर करतील आणि आपल्यावर कसा अन्याय होत आहे याचा पाढा वाचतील तेव्हा पक्षश्रेष्ठींना बचावाचा पवित्रा घ्यावा लागेल,असे कालपर्यंत समजले जात होते .परंतु परिस्थिती आता बदललेली आहे.मुंडे आता बचावाच्या पवित्र्यात आले आहेत आणि पक्षश्रेष्ठीच आक्रमक होऊन त्यांना आता फैलावर घेण्याच्या मनःस्थितीत आलेले आहेत. मुंडे यांनी महाराष्ट*ा तल्या आपल्या कथित जनाधाराचा नको एवढा भरवसा बाळगून आणि चुकीच्या सल्लागारांच्या सल्ल्याने जे बंड केले होते ते जवळजवळ फसल्यात जमा आहे. आता गोपीनाथ मुंडे यांना पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या वेदना सांगायच्या आहेत, परंतु त्या जेव्हा सांगितल्या जातील तेव्हा त्या किरकोळ आहेत हे त्यांच्याच लक्षात येईल आणि ज्या काही किरकोळ वेदना असतील त्या वेदना त्यांच्या अहंमन्य स्वभावातून निर्माण झालेल्या आहेत हेही त्यांच्याबरोबरच पक्षश्रेष्ठींच्याही ध्यानात येईल. संवाद कौशल्यामध्ये एक धडा दिला जातो. त्यामध्ये विचार करून बोला, असे सांगितले जाते. खरे म्हणजे हे सांगण्याची काही गरज नाही. परंतु सर्वसाधारणपणे लोक विचार न करता बोलतात आणि बोलल्यानंतर त्यांच्यावर विचार करण्याची पाळी येते. कारण ते अविचाराने बोललेले असतात आणि बोलण्याचे परिणाम दिसायला लागताच आता यातून बाहेर कसे पडावे यासाठी त्यांना नंतर विचार करत बसावे लागते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर अशी पाळी आलेली आहे. आपण पक्षात नाराज आहोत, असे त्यांनी जाहीर करून टाकले आणि अनेक नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. त्यातून मुंडे आता पक्षाच्या बाहेर पडणार, या चर्चेला वेग आला. आता मुंडे थोडेसे सावध झाले आहेत आणि आपण पक्षातून बाहेर पडणार नाही, असे म्हणायला लागले आहेत. एवढे करून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी आपण पक्षातून बाहेर पडणार असा प्रचार आपल्याच पक्षाचे लोक करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला आहे. थोडा बारकाईने विचार केला तर यामध्ये त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा काही दोष नाही. असेल तर त्यांचा स्वतःचाच दोष आहे. कारण त्यांनी माध्यमांसमोर आपण नाराज आहोत, असे जाहीर करून टाकले आणि नंतर भुजबळ तसेच उद्धव ठाकरे  यांची भेट घेतली. त्याशिवाय आपल्या समर्थक आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. अशा वेळी ते इतर पक्षात जाण्याच्या विचारात आहेत असा अर्थ कोणी काढला तर त्यात चूक काय? तेव्हा मुंडेंच्या इतर पक्षात जाण्याची चर्चा मुंडेंनीच सुरू करून दिलेली आहे. यात काही शंका नाही. परंतु आता मात्र त्यांच्यावर नमते घेण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्यासाठी अन्य पक्षाची कवाडे बंद आहेत.

      काँग्रेसचा दरवाजा त्यांच्यासाठी खुला होऊ शकतो, परंतु ते काँग्रेसमध्ये गेले तर त्यांचा नारायण राणे होऊन जाईल हे पक्के आहे. तरी सुद्धा ते काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना नंतर यापेक्षा भाजपमध्ये बरा होतो, असा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. हे त्यांनाही चांगले कळते. म्हणून काँग्रेसचा दरवाजा ते ठोठावणारच नाहीत.  शिवसेनेचा एक पर्याय होता. परंतु नितीन गडकरी यांनी, शिवसेनेने मुंडेंना आत घेतल्यास भाजपा-शिवसेना युती मोडेल, असा स्पष्ट इशारा दिला. त्यामुळे शिवसेना नेते हादरले आणि आपोआपच मुंडे यांच्यासाठी शिवसेनेचाही दरवाजा बंद झाला. राहता राहता राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे सख्य सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तेव्हा आपला असा कट्टर शत्रू शरद पवार आपल्या पक्षात घेतील असे संभवत नव्हतेच. मात्र राजकारणात काहीही चालते या तत्वानुसार मुंडे यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात होत्या. गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा तशी शक्यता वाटत होतीच. त्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादीकडे डोळे लावून बसलेले होते. परंतु मुंडे यांचे बंड थंड होत असतानाच्या ऐन मोक्यावरच शरद पवार यांनी, मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीत जागा नाही असा टोला लगावून मुंडे यांचा तिसरा पर्यायही बंद करून टाकला. पवार यांचे हे उत्तर फार मोक्यावर आलेले आहे. त्यामुळे पवार यांनी मुंडे यांना फार योग्यवेळी उत्तर दिले आणि आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले. आपल्याला सारे दरवाजे बंद आहेत हे आता मुंडे यांना सुद्धा समजून चुकले आहे. आता त्यांच्या समोर भाजपाच्या बाहेर पडून नवा पक्ष स्थापन करणे हा एकमेव आणि अव्यवहार्य मार्ग शिल्लक राहिला आहे, जो त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे.

      त्यामुळे सारे मार्ग बंद झालेले मुंडे आता सुरक्षात्मक पवित्र्यात आले असून या हरलेल्या मनःस्थितीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या वेदना सांगायला उभे राहणार आहेत. त्यावेळी त्यांनी पक्षातली आपली नाराजी अशी भडकपणे आणि माध्यमांसमोर का व्यक्त केली, या पहिल्याच प्रश्नाला मुंडे निरुत्तर होणार आहेत. मागच्यावेळी सुद्धा मुंडे यांनी अशीच गडबड केली होती आणि महाराष्ट्राच्या शाखेत आपला शब्द प्रमाण मानला जात नाही म्हणून पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले होते. त्यावेळी सुद्धा अडवानी यांनी तुमच्या काही व्यथा असू शकतात, परंतु त्या माध्यमांसमोर मांडण्याची गरज काय, असा प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर केले होते. आताही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मुंडे यांना फसलेल्या बंडाचा नायक म्हणून पक्षामध्ये आता निमूटपणे काम करावे लागणार आहे. पक्षाने तुम्हाला काय कमी दिलेले आहे, असा प्रश्न जर त्यांना केला तर त्याचे मुंडे यांना एका शब्दानेही उत्तर देता येणार नाही. त्यांना पक्षाने उपाध्यक्ष केले, लोकसभेतला विरोधी पक्षाचा उपनेता केले, पण तरीही त्यांनी नाराज होण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारल्यास मुंडे काय उत्तर देणार आहेत?

Leave a Comment