नगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा कायम

शिर्डी दि.२८ – बाह्यवळण रस्त्याच्या थांबलेल्या कामामुळे तर कधी अचानक वाढणाऱ्या भाविकांमुळे शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीचा अडथळा हा नित्याचाच भाग झाला आहे.शिर्डी वाहतूक पोलिसांची श्रीमंत भाविकांच्या गाड्यांवर मेहरनजर असून सामान्य भाविकांना कायद्याचा बडगा दाखविला जातो. पोलिसांच्या या भुमिकेमुळे सामान्य नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वतःच्या वाहनासह येण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. गर्दी वाढल्याने भाविकांना प्रसादालयाकडे जाण्यासाठी तर कधी भक्त निवासात जाण्यासाठी रस्ते ओलांडावा लागतो. शाळकरी मुलांना शाळेत जाताना, शाळेतून घरी येताना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. वाहतूक नियंत्रणासाठी शिर्डी पोलिसांचे २८ कर्मचारी तैनात आहेत. यातील ८ ते १० कर्मचारीच कामाच्या ठिकाणी काम करताना दिसतात. यातील अनेक कर्मचारी वाहतूक नियंत्रणाचे काम सोडून नातेवाईकांशी, मित्रांशी मोबाईलवर बोलताना दिसतात. काही शिगणापूर लाईनच्या अडचणी सोडवण्यात मग्न असतात. एक नंबर प्रवेशद्वारावरील कर्मचारी श्रीमंतांच्या गाड्यांची रखवाली करताना दिसतात. तसेच श्रीमंतांच्या गाड्यांना अडथळा होवू नये म्हणून बेकायदेशीररित्या भाविकांच्या गाड्या उचलून पोलिस ठाण्यात नेण्यात अनेक कर्मचारी धन्यता मानतात.