आघाडी, भ्रष्टाचार आणि महागाई

    राहूल  गांधी यांची एक गोष्ट बरी आहे. ते काही तरी बोलतात आणि नंतर त्याचा खुलासा करीत नाहीत. स्पष्टीकरण करीत नाहीत. आपले म्हणणे ते उदाहरणासह आणि तपशीलासह कधीच सांगत बसत नाहीत. ते बोलून राडा करतात आणि नंतर त्यांचे बाजिदे राहूलजींना नेमके काय म्हणायचे होते याचे खुलासे करीत खरकटे काढत राहतात. आपल्याला नेमके काय म्हणायचे होते याचे कसलेही स्पष्टीकरण ते करीत नाहीत. आताही त्यांनी भ्रष्टाचार आणि  महागाई यांना आघाड्यांचे राजकारण कारणीभूत असल्याची पुडी सोडून दिली. हा बाण शरद पवारांना लागला. त्यावर त्यानी नाराजी व्यक्त केली. मग काँग्रेसचे सारे पंडित खुलाशाला सरसावले. त्यांना तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारवी झाली पण मग या दोन गोष्टींना आघाडीचे सरकार कारणीभूत आहे याची प्रक्रिया काय आहे आणि तिच्याबाबतीत  राहूल गांधी यांना काय सांगायचे होते हे काही कळलेच नाही.  किबहुना त्यांना काहीच म्हणायचे नसावे आणि आपल्या अशा या विश्लेषणामुळे आघाडीत खळबळ माजेल याची त्यांना जाणीव नसावी.

तसे ते काहीही असले तरी काँग्रेस पक्ष आता  प्रचाराची कोणती लाईन घेणार आहे आणि भ्रष्टाचाराच्या कलंकातून मुक्तता मिळवण्यासाठी त्याचा कोणता युक्तिवाद राहणार आहे याचा अंदाज यायला लागला आहे. २ जी स्पेक्ट*म घोटाळा द्रमुकच्या ए. राजा यांनी केला आहे. ते यातले प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे हा दा्रमुकचा घोटाळा आहे असे म्हणण्याची सोय उपलब्ध आहे.पण मग महागाई कोणत्या घटक पक्षामुळे झाली असे त्यांना म्हणायचे होते हे काही समजलेच नाही. गंमतीचा भाग असा आहे की राहूल गांधी यांच्यापेक्षा कलिप सिबल आणि डॉ. मनमोहनसिंग काही वेगळेच बोलत आहेत.  कलिप सिबल तर या प्रकरणात काही भ्रष्टाचार झालाच नाही असे म्हणत आहेत. डॉ. मनमोहनसिग ही पहिल्यापासून तसेच सांगत आहेत. साधारणतः राहूल गांधी यांचे म्हणणे असे आहे की, सरकार आघाडीचे असले की, काही भ्रष्टाचारी घटक पक्षांना सांभाळून घेण्यासाठी त्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करावे लागते, नाही तर सरकार पडते.

अशाच प्रकारचा प्रचार पूर्वी स्थिर सरकारांच्या बाबतीत केला जात असे. एकाच पक्षाची सरकारे स्थिर असतात आणि खिचडी सरकारे ही अस्थिर असतात असे सांगितले जात असे. यातला गर्भितार्थ, काँग्रेसची सरकारे स्थिर आणि विरोधकांची अस्थिर असतात असा होता. १९७७ साली सत्तेवर आलेले मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे सरकार अडीच वर्षे टिकले होते. आणि ते सरकार जाऊन सत्तेवर आलेले चरणसिग यांचे सरकार तर केवळ आठ महिने टिकले होते. १९८० साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने हाच प्रचार केला आणि जनतेने हे म्हणणे मान्य करून काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले.  १९८५ साली राजीव गांधी यांना तर जनतेने अभूतपूर्व बहुमत दिले पण, हे सरकार काही स्थिर राहिले नाही. ते काँग्रेस पक्षात फूट पडून कोसळले. तरीही काँग्रेसचा प्रचार जारीच राहिला.  विरोधी पक्षांनी १९९६ पर्यंत तरी अस्थिर सरकारे देऊन काँग्रेसच्या या युक्तिवादाला दुजोराच दिला.यातली काही सरकारे तर काँग्रेसनेच अस्थिर केली होती. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांनी १८ पक्षांचे कडबोळे ६ वर्षे टिकवून दाखवले आणि या प्रचाराला चोख उत्तर दिले.अशा आघाड्यांची काही मजबुरी असते. कोणा कोणाला सांभाळून घ्यावे लागते. म्हणून राहूल गांधी, अशा सांभाळून घेण्यात आघाडीतल्या मुख्य पक्षाला त्यांचा भ्रष्टाचारही सहन करावा लागतो असे म्हणत आहेत. असे म्हणताना राहुल गांधी आणखी काही गोष्टी लोकांनी गृहित धराव्यात असे समजत आहेत. आघाडीतला मुख्य पक्ष स्वच्छ असतो, घटक पक्ष मात्र भ्रष्टाचार करणारे असतात आणि त्या स्वच्छ मुख्य पक्षाला त्या भ्रष्टाचारी घटक पक्षाचा भ्रष्टाचार सहन करावा लागतो असे ते मानून चालले आहेत. पण ही लहान लहान पक्षांची बदनामी आहे. यातला मुख्य पक्ष स्वच्छच असतो हेच म्हणणे कोणाला मान्य होणार नाही. त्या पक्षाला आपल्या स्वच्छतेचे एवढेच कौतुक असेल तर त्याने त्या लहान भ्रष्टाचारी पक्षाला, सरकार पडले तरी चालेल पण तुमचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असे ठणकावून सांगायला हवे. आघाडीतला मुख्य पक्ष तसे करत नसेल तर तो त्याचा दोष आहे. या ठिकाणी भ्रष्टाचारी घटक पक्षापेक्षा तो भ्रष्टाचार सहन करणारा मुख्य पक्षच अधिक दोषी असतो. आघाडी सरकार असले म्हणजे भ्रष्टाचार होतो आणि  एक पक्षीय सरकारमध्ये तो होत नाही असे सरसकट होत नाही.  आपल्या देशात सर्वात अधिक काळ टिकलेली आघाडी प.बंगालमध्ये आहे. गेली ३३ वर्षे ती तशीच आहे. तिच्यातले घटक पक्षही तेच आहेत. या आघाडीने आघाड्यांची सरकारे अस्थिर असतात हा प्रचार तर खोटा पाडला आहेच पण आघाड्यांच्या राजकारणात भ्रष्टाचार होणे आवश्यक नसते असेही दाखवून दिले आहे. देशात सर्वाधिक बहुमत घेऊन निवडून आलेल्या राजीव गांधी यांच्या एकपक्षीय सरकारमध्ये देशातला सर्वाधिक गाजलेला बोफोर्स घोटाळा झाला आहे हे या ठिकाणी विसरता कामा नये.

Leave a Comment