आगामी डावपेचांची चाहुल

निवडणुकीचे निकाल लागण्यास अजून तीन आठवडे आहेत, पण त्या निकालाच्या वेगवेगळ्या शक्यता गृहित धरून राजकीय नेत्यांची गणिते मांडली जायला लागली आहेत आणि ते स्वाभाविक आहे. राजकीय अस्थिरता निर्माण होईल असे गृहित धरून शरद पवारांसारख्या नेत्यांची समीकरणे तयार व्हायला लागली आहेत. भाजपाचे तसेच रालो आघाडीचे नेते आपणच सत्तेवर येणार असे गृहित धरून आहेत. शरद पवार हे भाजपावर तसेच नरेन्द्र मोदी यांच्यावर कडवट टीका करीत आहेत पण त्यांनीही एनडीए आघाडीला सर्वात जास्त जागा मिळतील हे मान्य केले आहे मात्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे पवारांना अजूनही पंतप्रधान होण्याच्या आशा आहेत असे दिसायला लागले आहे. महाराष्ट्रातले निवडणुकीचे चित्र तरी राष्ट्रवादीला फार वाईट आहे. राज्यातल्या ४८ जागांवर नजर टाकली तर राष्ट्रवादीच्या हमखास निवडून येणार्‍या जागा म्हणून पाच सहा जागांकडेही बोट दाखवण्याची सोय राहिलेली नाही. तरीही पवारांनी निवडणुकीनंतर काय करणार याची गणिते मांडायला सुरूवात केली आहे.

शरद पवार हे फार आशावादी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले नेते आहेत. पण माणसाचा आशावाद किती असू शकतो याचे अतिशयोक्त उदाहरण म्हणून ७४ वर्षे वयाच्या पवारांकडे पाहता येईल. त्यांनी भाजपाला सत्ता प्राप्त होईल असे स्पष्ट सांगतानाही कदाचित युपीए ३ सत्तेवर येऊ शकेल अशीही शक्यता व्यक्त केली आहे पण तसेही घडले नाही तर आपण तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देऊ असेही म्हणून ठेवले आहे. केन्द्रात कसलीही मांडणी झाली आणि भाजपाने ऐनवेळी पवारांना आघाडीत येण्याचा आग्रह धरला तर पवार भाजपाचे निमंत्रण स्वीकारणारच नाहीत याची आपणच काय पण खुद्द पवारही देऊ शकणार नाहीत. भारताच्या राजकारणात खरेच कोणत्याही आघाडीत जाऊ शकेल असा हा एकमेव नेता आहे. निवडणुकीनंतरच्या राजकारणाचा अंदाज घेताना आपल्याला पवारांवर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही कारण त्यांची गणिते किती खरी आणि किती खोटी असतात हे आपण जाणतोच. आज तरी कॉंग्रेसच्या नेत्यांची मनस्थिती सत्ता मिळेल अशी नाही. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपण आता राजकारणात राहणार नाही असेच जाहीर केले आहे. त्यांनी सन्यासाची पूर्ण तयारी केली आहे. कॉंग्रेसच्या आणि यूपीएच्या संघटनेत ज्याला विश्‍वासाने पंतप्रधान करता येईल असा नेता कोण आहे ?

मध्यंतरीच्या काळात पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान होण्याचा विचार गंभीरपणे केला होता. पण आता त्यांनी निवडणूक लढवण्याचाही विचार रद्द केला असल्याने ते खासदार असणार नाहीत. ए. के. अँटनी, सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली आहे पण तिच्या प्रचारात त्यांनी सातत्याने निवृत्तीचाच विचार बोलून दाखवला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते निवृत्तीच्या मनस्थितीत आहेत आणि शरद पवार गणिते मांडत असले तरीही तेही मंत्रिपदास उत्सुक नाहीत. अर्थात ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाहीत. कॉंग्रेसमध्ये एक केविलवाणी स्थिती निर्माण झाली आहे. काही प्रमाणात प्रशासकीय कौशल्य आणि क्षमता असलेले वृद्ध नेते सत्ताग्रहणाला राजी नाहीत आणि त्यांच्यानंतर पक्षात नेतृत्वाची नवी पिढी तयार नाही. मनमोहनसिंग, चिदंबरम आणि शिंदे यांच्या नंतर कोण असा प्रश्‍न विचारला की, दिग्विजयसिंग, जयराम रमेश असे उथळ नेतेच दिसायला लागतात. कॉंग्रेसच्या हातात सत्ता येणार नाहीच पण आली तरीही नेतृत्वाचा अतीशय गंभीर प्रश्‍न जाणवणार आहे. अर्थात नवे नेतृत्व काळाच्या ओघात आपोआप पुढे येत असते असे आपल्या मनाचे समाधान केले तरीही तसा नेता कोणीही पक्षात दिसत नाहंी.

पूर्वी अशी अवस्था कधी आली नव्हती. असा नवा नेता आला तरीही त्याच्या ताकदीवर युपीएचे घटक पक्ष एकत्र नांदणार का असाही प्रश्‍न आहे. अर्थात आपण युपीए आघाडीला सत्ता मिळेल ही दूरस्थ शक्यता गृहित धरून बोलत आहोत पण काहीही झाले तरी म्हणजे कॉंग्रेसच्या जागा १०० च्या आत आल्या तरीही या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून तरी काम करावे लागणारच आहे. ते तरी नीट करता येईल की नाही असाही एक गहन प्रश्‍न आहे. कारण त्यासाठीही काही वेगळी मनस्थिती असावी लागते आणि तसे नेते पक्षात असावे लागतात. कॉंग्रेसमध्ये अशाही अभ्यासू नेत्यांची वानवा आहे. कॉंगे्रेसच्या नेत्यांनी ज्या दिवशी नेहरू घराण्याची सून म्हणून पक्षाचे भवितव्य त्यांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी त्यांनी पक्षाची या अध:पाताकडील वाटचाल निश्‍चित केली. कारण त्यांच्या भोवती ते घराण्याचे वलय होते पण ते वलय केवळ विवाहामुळे निर्माण झाले होते. राजकीय नेतृत्व देण्याची क्षमता आणि दूरदृष्टी निर्माण करणारा व्यासंग या गोष्टी काही विवाहामुळे येत नसतात. सोनिया गांधी यांच्याकडे ती गुणवत्ता नव्हती आणि नाही. त्यांच्या त्या वलयाचा फायदा घेताना पक्षाची सारी सूत्रे सोनिया गांधी यांच्या हातात जायला नको होती. त्यांना अध्यक्ष केल्यावर २००४ साली सत्ता मिळाली आणि २००९ साली तर जागा वाढल्या त्यामुळे कॉंग्रेसचे नेते एवढे निश्ंिचत झाले की आता सोनिया गांधी म्हणजे पक्षाचा सुवर्ण काळ असे त्यांना वाटायला लागले. शेवटी अशी स्थिती आली.

Leave a Comment