
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून तो १,१५० ते १,२५० डॉलर प्रति औंसपर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने भारतात सोने स्वस्त होणार आहे ,साधारण प्रती तोळा २५,५०० ते २७,५०० रुपये असा दर राहील, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात १३०० डॉलर प्रति औंस असा सोन्याचा दर आहे. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याची किंमत २९ हजार ५०० ते ३० हजार रुपये प्रति १० ग्राम या दरम्यान आहे.
सोन्याचे दर घसरणार !
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने हे अंदाज वर्तविले आहेत ,त्यांच्या अभ्यासानुसार अमेरिका आणि युरोपीय क्षेत्रामध्ये २०१४-१५मध्ये जीडीपी दरात वाढ होईल. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत होईल. तसेच अमेरिकेत पारंपारिक चलनविषयक धोरण हळूहळू बंद केल्यामुळे व्याजदरात फायदा होऊ शकतो, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक करण्यापासून ते परावृत्त होतील.आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून त्याचे दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपातील देशांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने डॉलरही वधारू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी तितकासा आकर्षक पर्याय ठरणार नाही. परिणामी सोने स्वस्त होणार आहे.
