रू-पे राष्ट्रपतींच्या हस्ते देशाला अर्पण

rupay
भारताचे स्वतःचे कार्ड पेमेंट नेटवर्क रू-पे शुक्रवारी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते देशाला अर्पण केले जाणार आहे. हे कार्ड देशातील अंदाजे १ कोटी ६० लाख एटीएम, ९५ टक्के पीओएस टर्मिनल्स (अंदाजे ९ कोटी ४५ लाख), व १० हजारांच्या घरात असलेल्या बहुतेक सर्व ई कॉम ठिकाणी वापरता येणार आहे.

सध्या याच कार्डाचे व्हेरिएंट किसान कार्ड नावाने देशात अस्तित्वात आहे. रू-पे सर्व पब्लीक सेक्टर बँकांच्या मुख्य डेबिट कार्ड बरोबरच ग्राह्य धरले जाणार आहे. सध्या ४३ बँकांची डेबिट कार्ड देशात आहेत. या कार्डचे व्हेरिएंट प्रीपेड रू-पे लवकरच आणले जाणार असल्याचेही समजते. देशातील १५० हून अधिक कोऑप. बँका, ग्रामीण बँका रू-पे एटीएम कार्ड जारी करणार आहेत.

आजच्या तारखेपर्यंत १ कोटी ७० लाख कार्ड जारी केली गेली असून दरमहिना त्यात ३० लाखांची वाढ होत आहे. रूपी आणि पेमेंट या दोन शब्दातून रू-पे हे नांव या कार्डसाठी निश्चत करण्यात आले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय कार्ड योजनांवरचे अवलंबित्व कमी होणार आहे. नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडियाने हे कार्ड तयार केले असून ही संस्था ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी संस्था आहे.हिची स्थापना बँकींग उद्योगानेच केली आहे.