CBSE Board Exam 2025 : CBSE 10वी-12वी बोर्ड परीक्षा 2025 फॉर्म भरण्याची उद्या शेवटची तारीख, लवकर करा अर्ज


CBSE 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख उद्या, 4 ऑक्टोबर आहे. CBSE बोर्ड परीक्षा 2025 मध्ये बसलेले विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांमधून परीक्षा फॉर्म भरू शकतात. मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना विद्यार्थ्यांची यादी आणि आवश्यक शुल्क मुदतीपूर्वी सादर करावे लागणार आहे. बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे.

विद्यार्थ्यांना पाच विषयांसाठी 1500 रुपये आणि अतिरिक्त विषयांसाठी 300 रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. तर दृष्टिहीन विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शाळांना CBSE च्या अधिकृत वेबसाइट parikshasangam.cbse.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकत नाहीत
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने जारी केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी एलओसी सादर केले नाही, ते आगामी बोर्ड परीक्षेला बसू शकत नाहीत. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शाळांसाठी उमेदवारांची यादी (LOC) सादर करणे, ही अनिवार्य प्रक्रिया आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन LOC प्रक्रियेद्वारे सादर केली गेली आहेत. त्यांना CBSE बोर्डाच्या 2025 च्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल.

कधी प्रसिद्ध होणार वेळापत्रक?
CBSE 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा 2025 15 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई डिसेंबरपर्यंत वेळापत्रक जाहीर करू शकते. डेटशीट अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर PDF फॉरमॅटमध्ये प्रसिद्ध केली जाईल, जे विद्यार्थी डाउनलोड करू शकतील.

कधी होणार प्रात्यक्षिक परीक्षा?
10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी 2025 मध्ये घेतल्या जाऊ शकतात. यासाठी सीबीएसई लवकरच वेळापत्रक जारी करेल. हायस्कूल प्रात्यक्षिक परीक्षा शालेय स्तरावरच घेतली जाईल, तर 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या परीक्षकाद्वारे घेतली जाईल.

प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर शाळांमध्ये बोर्डाच्या पूर्व परीक्षा घेतल्या जातील. परीक्षेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 2023 मध्येही बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या.