Jasprit Bumrah Off Spinner : जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्ध बनला ‘ऑफ-स्पिनर’ आणि उडून गेले मुशफिकुर रहीमचे स्टंप


टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात बुमराहने 3 बळी घेतले. त्याची तिसरी विकेट अप्रतिम होती. त्याने मुशफिकुर रहीमला ज्या प्रकारे चेंडू टाकला, ते पाहून क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले. बुमराह त्याच्या अप्रतिम यॉर्करसाठी ओळखला जातो. तो चेंडू सीम आणि स्विंग दोन्हीही करतो, पण कानपूर कसोटीच्या पाचव्या दिवशी तो ऑफ-स्पिनर बनला. होय, आश्चर्यचकित होऊ नका, बुमराहने मुशफिकरला तसाच एक चेंडू टाकला.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लंचच्या आधी मुशफिकर रहीमला बोल्ड केले. रहिमने त्याच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि स्टंपला लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुमराहचा हा चेंडू संथ होता आणि खेळपट्टीवर पडल्यानंतर या चेंडूला खूप ऑफ-स्पिन मिळाले. चेंडू बुमराहने नव्हे तर अश्विनने फेकल्यासारखे वाटत होते. बुमराहचा हा चेंडू पाहून मुशफिकुर रहीम आश्चर्यचकित झाला, त्याला विश्वास बसत नव्हता की हा चेंडू इतका वळला कसा आणि विकेटमध्ये गेला.


खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी विक्रमी फलंदाजी करत पहिला डाव 285 धावांवर घोषित केला, तर पाचव्या दिवशी संघाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. अश्विन, जडेजा आणि बुमराह या त्रिकुटाने बांगलादेशच्या फलंदाजांना श्वासही घेऊ दिला नाही. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ केवळ 146 धावांवर गारद झाला. बुमराहने अवघ्या 17 धावांत 3 बळी घेतले. अश्विनने 50 धावांत 3 तर जडेजाने 34 धावांत 3 बळी घेतले. आकाश दीपला एक विकेट मिळाली.