
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरने आपल्या तुफानी गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा डावखुरा वेगवान गोलंदाज सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत खेळत आहे, जिथे त्याने गोव्याकडून खेळताना KSCA XI विरुद्ध कहर केला. या रेड बॉल स्पर्धेत अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवून दिला. अर्जुन तेंडुलकरने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने पाच तर दुसऱ्या डावात या खेळाडूने चार बळी घेतले.
Video : 9 विकेट घेत अर्जुन तेंडुलकरने केला कहर, संघाला मिळवून दिला विजय
अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनचा डाव पत्त्याच्या गठ्ठ्यासारखा उधळला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात केवळ 41 धावांत 5 बळी घेतले. अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनच्या पहिल्या पाचपैकी चार फलंदाजांना एकहाती बाद केले आणि त्यानंतर अक्षन रावची विकेट घेत पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. केएससीए इलेव्हन संघाला पहिल्या डावात केवळ 103 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गोवा क्रिकेट असोसिएशन संघाने पहिल्या डावात 413 धावांची मोठी मजल मारली. अभिनव तेजरानाने 109 धावांची खेळी केली. मंथन खुटकरने 69 धावांची खेळी खेळली, तर अर्जुन तेंडुलकरने 18 धावांचे योगदान दिले.
arjun tendulkar 5 wicket hall for goa DR (CAPT) K THIMMAPPIAH MEMORIAL TOURNAMENT – 2024-25 #arjuntendulkar pic.twitter.com/Uv66lbYTJm
— ANOOP DEV (@AnoopCricket) September 16, 2024
यानंतर अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या डावात गोलंदाजीतील पराक्रम पुन्हा सिद्ध केला. यावेळी केएससीए इलेव्हन संघ अवघ्या 121 धावांत गारद झाला आणि यावेळीही अर्जुनने सर्वाधिक नुकसान केले. अर्जुनने दुसऱ्या डावात 55 धावांत 4 बळी घेतले. अशाप्रकारे अर्जुनने एकूण 9 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्जुनने त्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
अर्जुन तेंडुलकरसाठी पुढील रणजी हंगाम खूप महत्त्वाचा आहे. पुढील महिन्यापासून रणजी ट्रॉफी सुरू होत असून त्यापूर्वी हा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. गोव्यासाठी चांगली कामगिरी त्याच्यासाठी आणखी दरवाजे उघडू शकते. अर्जुनच्या फर्स्ट क्लास करिअरबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 13 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय या खेळाडूने बॅटनेही आपली धमक दाखवली आहे. अर्जुनने रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले असून त्याच्या बॅटने 481 धावा केल्या आहेत.
