सुमित अंतिलची यशोगाथा या मित्राशिवाय आहे अपूर्ण, लाखोंची नोकरी सोडून तो बनला मालिश करणारा


आयुष्यात चांगले मित्र मिळणे महत्वाचे असते आणि जर तो चांगला मित्र सुमित अंतिलच्या बालपणीच्या मित्र मोहितसारखा असेल, तर काय बोलावे? आज तो जिथे उभा आहे, तिथे सुमित अंतिलची कहाणी त्या मित्राशिवाय अपूर्ण आहे. केवळ आम्हीच नाही, तर खुद्द सुमित अंतिलही यावर विश्वास ठेवतो. सुमितने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये हे सांगितले होते. त्याचा मित्र मोहितचा संदर्भ देत त्याने सांगितले होते की त्याने यश मिळवण्यासाठी लाखोंची नोकरी सोडली.

समित अंतिल आणि मोहित हे बालपणीचे मित्र. दोघांनीही शालेय शिक्षण एकत्रच केले. दोघेही एकाच वर्गात एकत्र शिकत होते. आता ही मैत्री किती घट्ट आणि खरी आहे ते समजून घ्या. लाखोंची कमाई करणाऱ्या मर्चंट नेव्हीमध्ये मोहितने काम करायला सुरुवात केली. पण, मित्राचा अपघात झाल्याचे समजताच त्याने नोकरी सोडली. तो नोकरी सोडून सुमित अंतिलकडे आला आणि म्हणाला, तुला जे करायचे आहे, ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे.

मोहित गेल्या अनेक वर्षांपासून सुमित अंतिलला प्रोत्साहन देत आहे. तो त्याच्या मित्रासाठी धैर्याची ढाल म्हणून उभा आहे. सुमितच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो थकतो, तेव्हा मोहित त्याच्यासाठी फिजिओ म्हणून काम करतो. तो त्याला मसाज देतो. त्याचे हात पाय दाबतो आणि असे करण्यात त्याला लाज किंवा संकोच वाटत नाही. सुमित म्हणतो की, जेव्हा तो मोहितकडे पाहतो, तेव्हा त्याला आनंद होतो, प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी उभा राहणारा आपला एक मित्र आहे, या विचाराने तो आनंदी होतो. ज्याने मला बनवण्यासाठी आपल्या कारकिर्दीचा त्याग केला.

आता तो चांगले आयुष्य जगण्याची जबाबदारी माझी आहे, कारण त्याने माझ्यासाठी त्याची स्वप्ने धोक्यात आणली. सुमितच्या मते, पॅरालिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापेक्षा त्याचा मित्र मोहितचे स्वप्न अधिक होते. त्याने माझ्या आयुष्यात स्थैर्य आणले आहे, आता मी त्याचे आयुष्य सेटल करेन.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर सुमित अंतिलने प्रथम आयओसी पॉडकास्टमध्ये त्याचा मित्र मोहितबद्दल सांगितले. आता त्याने त्याच यशाची पुनरावृत्ती करून पॅरिसमध्ये नवा पॅरालिम्पिक विक्रम केला आहे. एक चांगला मित्र सोबत असेल, तर आयुष्य सोपे होते हे खरे आहे.