
धूम्रपानामुळे आरोग्यास गंभीर हानी पोहोचू शकते. याच्याशी संबंधित अनेक अज्ञात आणि दुर्मिळ समस्या निर्माण होऊ शकतात. अलीकडेच ऑस्ट्रियामध्ये धूम्रपानाशी संबंधित दुर्मिळ आजाराचे प्रकरण समोर आले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी धूम्रपान करण्यास सुरुवात केलेल्या 52 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यात लहान केस उगवले आहेत. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच केस आहे, जी अमेरिकन जर्नल ऑफ केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाली आहे.
त्या व्यक्तीची एक चूक आणि गळ्यात उगवले केस, पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का !
अमेरिकन जर्नलच्या रिपोर्टनुसार, रुग्णाला 1990 पासून सिगारेट ओढण्याचे व्यसन होते. 2007 मध्ये जेव्हा तो डॉक्टरांकडे गेला, तेव्हा त्याला सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. कॅमेऱ्याने तपासणी केली असता डॉक्टरांना आढळले की त्याच्या गळ्यामध्ये अनेक लहान काळे केस वाढले आहेत. हे पाहून त्यांना धक्काच बसला, कारण असा प्रसंग त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.
यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला औषध दिले, पण त्याचाही फारसा फायदा झाला नाही. अहवालानुसार, डॉक्टरांनी गळ्यातील केस काढले, परंतु त्यानंतरही पुढील 14 वर्षे रुग्णाच्या मानेवर केस वाढतच राहिले. नियमित धूम्रपान केल्यामुळे ही समस्या त्या व्यक्तीला झाली असावी, असे डॉक्टरांचे मत आहे. त्याला त्यांनी ‘एंडोट्रॅचियल केस ग्रोथ’ असे नाव दिले आहे.
डॉक्टरांच्या मते, धुम्रपानामुळे घशात सूज येते, ज्यामुळे पेशींचे रूपांतर लहान केसांमध्ये होते. हे केस 6-9 इंच पर्यंत वाढू शकतात आणि कधीकधी तोंडापर्यंत पोचण्याचा प्रयत्न देखील करतात.
अहवालानुसार, 2020 मध्ये त्या व्यक्तीने धूम्रपान सोडले आणि एंडोस्कोपिक ऑर्गन प्लाझ्मा कोग्युलेशन नावाचा उपचार सुरू करण्यात आला. यामध्ये केस वाढण्याचा मार्ग बंद होतो. सुमारे 2 वर्षांच्या उपचारानंतर त्या व्यक्तीची या समस्येतून सुटका झाली. ऑस्ट्रियातील हे प्रकरण धूम्रपानाचे घातक परिणाम दर्शविते आणि लोकांनी धूम्रपानाचे दुष्परिणाम गांभीर्याने घेणे आणि ते सोडण्यास प्रवृत्त होणे महत्त्वाचे आहे.
