3 षटकात सोडले 4 झेल, क्षेत्ररक्षणात दिल्ली कॅपिटल्सची झाली दुर्दशा


आयपीएल 2024 चा 62 वा सामना 12 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना होता. हा सामना गमावल्याने दिल्लीचा प्ले-ऑफचा मार्ग जवळपास बंद झाला असता, पण जर बेंगळुरूनेही हा सामना गमावला असता, तर ते थेट बाहेरच झाले असते. मात्र या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांना नशिबाने साथ दिली. या सामन्यात बंगळुरूच्या विल जॅक आणि रजत पाटीदार यांना प्रत्येकी दोन संधी मिळाल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाने तीन षटकांत त्यांचे चार झेल सोडले.


दिल्ली कॅपिटल्स संघ 12 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे. त्याच्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. कर्णधार ऋषभ पंत यापूर्वीच एका सामन्याच्या बंदीची शिक्षा भोगत होता. यानंतर नवा कर्णधार अक्षर पटेलसह दिल्लीच्या क्षेत्ररक्षणाने बरीच निराशा केली. संघाने तीन षटकांत तुफानी फलंदाजी करणाऱ्या विल जॅक आणि रजत पाटीदार यांचे चार झेल सोडले. यामध्ये अक्षर पटेलने स्वतः दोन झेल सोडले, त्यानंतर शे होपने एक आणि ट्रिस्टियन स्टब्सने एक झेल सोडला. यानंतर पाटीदारने अर्धशतक झळकावले, तर जॅकनेही 41 धावा केल्या.


वास्तविक, त्याने 9व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गुगली टाकली, जी विल जॅकला समजू शकली नाही. त्याचा चेंडू अक्षर पटेलच्या हातात लागला, पण तो पकडू शकला नाही. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर पाटीदारने चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला. तो कुलदीपच्या फिरकीत लाँग ऑनवर झेलबाद झाला असता. पण शे होपने हातात आलेला सोपा झेल सोडला. पुढच्याच षटकात जॅकने पुन्हा संधी दिली, पण स्टब्सला तो पकडता आला नाही. 10व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाटीदारच्या झेलची संधी होती, पण दिल्लीने तीही गमावली.

दिल्लीसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे दोन्ही फलंदाज फारसे नुकसान करू शकले नाहीत. 94 धावांवर दिल्लीने पहिला झेल सोडला होता. यानंतर पाटीदार आणि जॅक केवळ 44 धावाच जोडू शकले. 137 धावांपर्यंत मजल मारताना दिल्लीच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार अक्षर पटेलने दोन्ही फलंदाजांचे अप्रतिम झेल घेत सुटलेल्या झेलची भरपाई केली.